कोल्हापूर : राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे ‘महादेवा’ योजनेंतर्गत 13 वर्षांखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळाडूंची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. यातून निवडलेल्या खेळाडूंना दि. 14 डिसेंबरला मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर जगप्रसिद्ध अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लियोनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.
राज्याचा क्रीडा विभाग, मित्रा संस्था, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) तर्फे राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार, प्रसारासाठी ‘महादेवा’ ही योजना राबविली जात आहे. या अंतर्गत राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअरसाठी प्रोत्साहन व पाठबळ दिले जाणार आहे. राज्यभरातून सुमारे 100 खेळाडूंची निवड केली जाईल. त्यातून अंतिम टप्प्यात 30 खेळाडू मेस्सी सोबत खेळण्यासाठी पात्र ठरणार असल्याची माहिती क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली यांनी राज्यातील क्रीडा अधिकार्यांना दिली आहे. खेळाडूंची निवड चाचणीसाठी लवकरच मैदान निश्चित केले जाणार आहे. त्याची माहिती खेळाडूंना दिली जाईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया...
उपक्रमासाठी तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया होईल. जिल्हा स्तर निवड चाचणी दि. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर तर विभागस्तर निवड चाचणी दि. 3 ते 22 नोव्हेंबर आणि राज्यस्तर निवड दि. 24 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
उपक्रमासाठीच्या निवड चाचणीसाठी विफाचे तांत्रिक सहकार्य असणार आहे. महादेवा उपक्रमातून राज्यातील फुटबॉल खेळाला नवी दिशा आणि फुटबॉल खेळातील करिअरसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. खेळाडूंनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
मालोजीराजे (उपाध्यक्ष, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन)