कोल्हापूर : घरफोडीतील जप्त केलेल्या दागिन्यांसह पोलिस अधिकारी, कर्मचारी.  Pudhari File Photo
कोल्हापूर

नागाळा पार्कातील दहा तोळे सोने मोलकरणीनेच चोरल्याचे उघड

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : नागाळा पार्कातील खानविलकर पेट्रोल पंपाजवळ घरफोडी करून चोरट्याने 10 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्याची किंमत 6 लाख 60 हजार इतकी आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. 20) गुन्हा नोंद झाला. त्यानंतर 24 तासांत एलसीबीने तपास करून घरफोडी उघडकीस आणली. घरकाम करणार्‍या महिलेनेच दागिन्यांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. संबंधित महिलेला अटक करून 5 लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही कारवाई केली.

9 महिने घटना समजलीच नाही...

आशिष अंबादास देशमुख (वय 48) हे कुटुंबीयांसह नागाळा पार्क, हरिपूजापूरम येथे राहतात. 5 जानेवारी ते 9 सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली. चोरट्यांनी त्यांच्या घरातील बेडरूमच्या कपड्याच्या कपाटात ठेवलेले 101.5 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. यात 35 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या 1 जोड, 36 ग्रॅम वजनाचे बिल्वर 4 नग, सोन्याचे टॉप्स एक जोड, 19 ग्रॅम वजनाचा नेकलेस, जोधंळ पोत एक यासह इतर दागिन्यांचा समावेश होता.

5 लाखांचे दागिने जप्त

पोलिस निरीक्षक कळमकर, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस अंमलदार अमित सर्जे यांना देशमुख यांच्या घरात आठ वर्षांपासून काम करणार्‍या महिलेनेच दागिने लंपास केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सिद्धवा लिंगाप्पा गर्गद (वय 40, सध्या रा. नागाळा पार्क, मूळ रा. बेडसूळ, ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) हा घरकाम करणार्‍या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता ती संशयास्पद उत्तरे देऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घरात झडती घेतली असता 5 लाखांचे दागिने सापडले. त्याविषयी पोलिसांनी विचारणा केल्यावर देशमुख यांच्या घरातून चोरल्याची कबुली तिने दिली.

या कारवाईत पोलिस कृष्णात पिंगळे, विलास किरोळकर, संजय पडवळ, बालाजी पाटील, तृप्ती सोरटे, प्रज्ञा पाटील सहभागी होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT