Kolhapur boundary extension | सतत विरोध... सतत पिछाडी Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur boundary extension | सतत विरोध... सतत पिछाडी

हद्दवाढीचा मुद्दा अजूनही राजकीय चक्रातच

पुढारी वृत्तसेवा
राजेंद्र जोशी

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा अजूनही राजकीय चक्रात अडकलेला आहे. विकासाच्या प्रत्येक प्रयत्नाला विरोध आणि याचा गंभीर फटका भविष्यातील संधींना बसू शकतो. राज्यातील काही शहरांनी हद्दवाढीच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग स्वीकारला, पण कोल्हापुरात मात्र राजकारण आणि हितसंबंध हद्दवाढ रोखत आहेत.

पुणे महापालिकेची 75 वर्षांमध्ये 20 वेळा हद्दवाढ झाली. यातील 2017 आणि 2021 या दोन हद्दवाढी महत्त्वाच्या ठरल्या. आता 500 चौरस किलोमीटर क्षेत्राची पुणे महापालिका मोठी झाल्याने तेथे हडपसर व हिंजवडी अशा दोन नव्या महापालिकेचे प्रस्ताव पुढे आलेत. नाशिकची हद्दवाढ झाल्यामुळे तेथे पायाभूत सुविधांचा डोंगर उभा राहू शकला. सोलापूरची 3 वेळा हद्दवाढ झाली. सांगलीच्या दुसर्‍या हद्दवाढीवेळी धामणी गाव समाविष्ट झाले. हद्दवाढीमुळे या शहरांचा कायापालट झाला.

कोल्हापुरातील तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने घर सोडून या शहरांकडे धावताहेत. आपण विरोधात धन्यता मानणार असू तर कोल्हापूरचा कायापालट अशक्य आहे. येथे कोणतेही नवे उद्योग येणार नाहीत, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाहीत, मोठे प्रकल्प येण्याची शक्यता नाही. याउलट आपली मुलेबाळे बाहेर गेली तर कोल्हापूरचा वृद्धाश्रम होण्यास वेळ लागणार नाही.

केंद्र सरकारने 21 व्या शतकाच्या प्रारंभी प्रधानमंत्री नगरोत्थान योजना अमलात आणली. या योजनेसाठी 10 लाख लोकसंख्येचा निकष होता. तेव्हा कोल्हापूरची लोकसंख्या जेमतेम 6 लाखांवर होती. कोल्हापुरात सातत्याने मागणी होऊनही 53 वर्षे एक उड्डाण पूल होऊ शकला नाही. या पायाभूत सुविधा नव्या उद्योगांच्या जागा निवडीसाठी महत्त्वाच्या ठरतात.

कोल्हापुरातील 2 बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केवळ शहराच्या पायाभूत सुविधा सुमार दर्जाच्या आहेत, या कारणास्तव कोल्हापुरातून काढता पाय घेतला, हा अलीकडचा इतिहास आहे. मग विरोध किती दिवस करत बसणार? तोही कोणाच्या सांगण्यावरून, ऐकून करणार? कारण, आपला लोकप्रतिनिधी आज ज्या राजकीय पक्षात आहे त्या पक्षात उद्या राहील याची खात्री नाही. मग राजकारण सोडा, स्वत:च्या पोराबाळांच्या भवितव्यासाठी का होईना विचार करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (उत्तरार्ध)

हद्दवाढीची यशस्वी उदाहरणे

नाशिक : पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप, कुंभमेळ्याचा भरघोस निधी

सोलापूर : तीन वेळा हद्दवाढ, सत्ताकेंद्रांची इच्छाशक्ती

सांगली : अलीकडेच दुसर्‍या हद्दवाढीत ‘धामणी’चा समावेश

औरंगाबाद, नागपूर, पुणे : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ. पुण्याची तर 20 वेळा हद्दवाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT