कोल्हापूर : राजेंद्रनगर, म्हाडा कॉलनी येथे खासगी भिशी चालविणार्या दाम्पत्याने गाशा गुंडाळून पलायन केले. 25 लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद राजेंद्र आप्पासाहेब थोरवत (रा. म्हाडा कॉलनी) यांच्यासह 38 सभासदांनी शनिवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. भिकाजी पंडित शिंदे व प्राजक्ता भिकाजी शिंदे (रा. राजेंद्रनगर, म्हाडा कॉलनी, सध्या, वाडी शिरगाव, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.
2022 ते 2024 या काळात भिकाजी व त्याची पत्नी प्राजक्ता यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन खासगी भिशी सुरू केली. राजेंद्रनगर, म्हाडा कॉलनीसह परिसरातील नागरिकांनी रोख व ऑनलाईनद्वारे भिशीमध्ये पैसे गुंतविले. मुदतीनंतर व्याजासह मुद्दल मिळण्यासाठी सभासदांनी तगादा लावला. मात्र शिंदे दाम्पत्याने रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. सभासदांचा ससेमिरा टाळण्यासाठी दाम्पत्याने गाशा गुंडाळला. फसगत झाल्याचे लक्षात येताच थोरवत यांच्यासह सभासदांनी आर्थिक गुन्हे शाखा व राजारामपुरी पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.