कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी बेनिक्रे (ता. कागल) येथील शिक्षकाने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अंगावर ज्वालाग्रही पदार्थ ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस आणि अग्निशमन दलातील जवानांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला. शाहूपुरी पोलिसांनी याप्रकरणी शंकर पांडुरंग रामशे (वय 50) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांची काहीकाळ तारांबळ उडाली.
बेनिक्रे येथे रामशे यांची वडिलोपर्जित शेती आहे. गट क्रमांक 48 मध्ये नारळाची काही झाडे आहेत. या जागेत त्यांनी पत्र्याचे शेड उभारले आहे. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनही टाकली आहे. शेताच्या बाजूला संरक्षक भिंतही उभारली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कुरूकली, बेनिक्रे, अर्जुनवाडा, करड्याळ गावांना जोडणार्या रस्त्यालगत ही शेती आहे. रस्त्याबाबत गट नंबर 48 च्या बाजूस असलेल्या रस्त्याबाबत शंकर रामशे यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. जुलै 2025 रोजी निर्णय विरोधात लागल्याने त्यांनी 29 ऑगस्ट 2025 मध्ये वरिष्ठ न्यायालयात अपील केले; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांनी पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने शेताची संरक्षक भिंत पाडून नारळाची झाडेही जमीनदोस्त केली.
यााविरुद्ध रामशे यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून संबंधित अधिकार्यांवर कारवाईची मागणी करत न्याय मिळत नसेल, तर आत्मदहनाचा इशारा दिला होता. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्त तैनात केला होता. दुपारी बारा वाजता शिक्षक रामशेसह दोघेजण दुचाकीवरून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आले. पोलिस त्याच्या मागे लागताच त्यांनी दुचाकीवरच ज्वालाग्रही पदार्थ स्वत:च्या अंगावर ओतून घेण्यास सुरुवात केली.
दोनशे मीटर पाठलाग करून पोलिस रवी आंबेकर यांनी झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. अग्निशमन दलाचे सुरेंद्र जगदाळे, विक्रम कुंभार, सतीश यादव यांनी रामशे यांच्या हातातील कॅन काढून घेतला. अधिकाराचा गैरवापर करून शेतीसह मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी रामशे यांनी यावेळी केली. आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामशे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक डोके यांनी सांगितले.