Balumama Trust Clerk Kidnapping Case | कार्याध्यक्ष, विश्वस्तासह सहा जणांवर गुन्हा दाखल File Photo
कोल्हापूर

Balumama Trust Clerk Kidnapping Case | कार्याध्यक्ष, विश्वस्तासह सहा जणांवर गुन्हा दाखल

तिघांना अटक; तिघेजण अद्याप फरार

पुढारी वृत्तसेवा

गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील प्रसिद्ध बाळूमामा मंदिर ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या वादाला नवे वळण लागले आहे. ट्रस्टच्या प्रोसिडिंगमध्ये फेरफार करून लिपिकाचे अपहरण व धमकी दिल्याप्रकरणी कार्याध्यक्ष, विश्वस्तासह सहा जणांविरोधात भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपी फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबुराव होडगे (रा. जरळी, ता. गडहिंग्लज) व विश्वस्त विजय विलास गुरव (रा. आदमापूर) यांनी फसवणुकीच्या उद्देशाने ट्रस्टमधील लिपिक अरविंद गणेश स्मार्त (रा. गारगोटी) यांचे गारगोटी बसस्थानकावरून अपहरण केले. त्यानंतर त्यांना फये येथील हिलटॉप रिसॉर्टवर नेऊन जीवघेणी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच बाळूमामा ट्रस्टच्या 2025 मधील बैठकीत 39.50 गुंठे जमीन खरेदीचा ठराव करून त्यात नामदेव आबासो पाटील व मारुती ज्ञानदेव पाटील (दोघे रा. दाघेही, आदमापूर) यांची विश्वस्त म्हणून नावे आणि दोन वकिलांची सल्लागार म्हणून नावे प्रोसिडिंगमध्ये जबरदस्तीने नोंदविण्यास भाग पाडल्याचे फिर्यादी लिपिक अरविंद स्मार्त यांनी पोलिसांत दिली आहे.

या प्रकरणी कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, विश्वस्त विजय गुरव, आनंदा मारुती पाटील, नामदेव आबासो पाटील, मारुती ज्ञानदेव पाटील (सर्व रा. आदमापूर) व विनायक कुंडलिक पाटील (रा. मुदाळ) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी लक्ष्मण होडगे, विजय गुरव व आनंदा पाटील या तिघांना अटक केली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे आदमापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक योगेश गोरे व सहायक फौजदार एस. बी. मगदूम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT