कोल्हापूर : चार्टर्ड अकाऊंटंटस् कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या परीक्षेतून कोल्हापूरमधील 249 विद्यार्थ्यांमधून 34 विद्यार्थी सीए उत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागातून आसिम मेमन याने प्रथम क्रमांक पटकावला. अभिमान माळी याने दुसरा, ऋतुराज दाबाडे याने तिसरा व सुष्मिता काटकर हिने चौथा क्रमांक मिळवला.
‘सीए’ परीक्षेनंतर 3 नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल घोषित करण्यात आला. कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात चैत्रा मुजुमदार, श्रीकांत महाजन, आकांक्षा पाटील, प्रथमेश गोगवेकर, ऋषिकेश पोवार, नमिता गाडवे, पूनम उपाध्ये, रसिका पाटील, अपूर्व हजारे, दर्शनी तोडकर, साक्षी झंवर, दिगंबर पाटील, जान्हवी करमरकर, ओंकार सामंत, आदित्य काजरेकर, राजकुमार मसवडे, श्यामसुंदर मालू, श्रुती गाट, मानसी कर्पट्टी, ज्योतिबा पाटील, यश पाटील, प्रियांका सावंत, ईशा गाटे, जान्हवी पावसकर, संजना दरयानी, मिथ गांधी, सूरज पाटील, बिपाशा शेख, पूजा लटकन आणि तुषार सुभाष घराळ हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाल्याची माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए नितीन हरगुडे यांनी दिली.
आसिमचे कुटुंब मूळचे मालवणचे असून, वडिलांचे किराणा मालाचे दुकान आहे. सहावीत असतानाच तो कोल्हापुरात आला. पदवीपर्यंतचे शिक्षण येथेच घेतले. त्यानंतर 2020 पासून चार्टर्ड अकाऊंटंटस् कोर्सचा अभ्यास सुरू केला. रोज आठ तास अभ्यास केल्याने यश मिळाले. काका अन् आजीला मी ‘सीए’ बनावे, असे वाटत होते. त्यामुळे मालवण ते कोल्हापूर असा दहा वर्षांहून अधिकचा प्रवास करत त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद वाटतो, अशी भावनिक प्रतिक्रिया त्याने दिली.
कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक पटकावलेल्या अभिमान माळी याने घरातील भिंतीवर पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणार, असे लिहून ठेवले होते. त्याप्रमाणे दहावी आणि सीएच्या परीक्षेत यश मिळवले. मेहनत घेतली, अभ्यास केला की कष्टाचे चीज होते, अशी भावना त्याने व्यक्त केली.