कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे. सोबत बयाजी शेळके, प्रकाश पाटील, नंदकुमार ढेंगे, रणजितसिंह पाटील, अमरसिंह पाटील, प्रा. किसन चौगुले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, नाविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आदी. Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul Meeting : भेसळयुक्त दूध घालणार्‍या संस्थांचे सभासदत्व रद्द

‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : भेसळयुक्त दूध घालणार्‍या दूध संस्थांवर निर्बंध आणण्यासाठी तीनवेळा संधी देऊनही चौथ्यांदा भेसळयुक्त दूध आढळल्यास त्या दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचा व पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा ठराव कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी करण्यात आला. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे होते.

गुणवत्तापूर्ण दूध हेच ‘गोकुळ’चे वैशिष्ट्य आहे. ती गुणवत्ता राखण्यासाठी भेसळयुक्त दूध घालणार्‍या संस्थांना तीनवेळा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत दंडाची कारवाई केली जाईल. त्यानंतर मात्र संस्थेचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. याशिवाय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा, किमान 50 लिटर दूध घालण्याची संस्थांना असणारी अट रद्द करण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

यावेळी बोलताना डोंगळे म्हणाले, अहवाल सालात ‘गोकुळ’ची वार्षिक उलाढाल 3 हजार 670 कोटी झाली असून, भागभांडवलामध्ये 1 कोटी 98 लाखांनी वाढ झाली आहे. 31 मार्च 2024 अखेर ‘गोकुळ’ला निव्वळ नफा 11 कोटी 66 लाख इतका झाला आहे. दूध संस्थांच्या बळकटीकरणासाठी ‘गोकुळ’च्या वतीने 35 योजना राबविल्या जात असून, त्यासाठी 19 कोटी 42 लाखांचे अनुदान दिले आहे. दूध संकलनात भरीव वाढ झाली आहे. यामध्ये गायीच्या दुधाचे प्रमाण अधिक असल्याने म्हैस दूधवाढीसाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दूध संकलन चांगले असल्याने नोव्हेंबर 2023 पासून बाहेरची बल्क दूध खरेदी पूर्णपणे थांबविली आहे. वाशी शाखेमध्ये दह्याचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ‘गोकुळ’च्या वतीने पेढ्याचेही उत्पादन सुरू केले आहे. ‘गोकुळ’ला गेल्या तीन वर्षांपासून ‘आयएसओ’ नामांकन मिळाले आहे. ‘गोकुळ शक्ती’ नावाने बाजारात आणलेल्या दुधास अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘गोकुळ’ची उत्पादने सुमारे 150 मॉलमध्ये ठेवण्यात आली आहेत. ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ नवीन पशुखाद्य बाजारात आणण्यात आले आहे.

वैरण बँक स्थापन करण्यात आली असून, जनावरांचा भाकड काळ कमी करण्यासाठी वंध्यत्व निवारण शिबिरे गावोगावी घेण्यात येत आहेत. कृत्रिम रेतन सेवेचे बळकटीकरण करण्यात आले असून, ‘गोकुळ हर्बल पशूपूरक’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. बोरवडे शीतकरण केंद्रात एक्स-रे मशिन घेण्यात येणार असून, करमाळा येथे सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फार्मर्स पॅकेज विमा पॉलिसी, चेअरमन आपल्या गोठ्यावर योजनाही राबविण्यात आल्या आहेत. पशुवैद्यकीय महाविद्यालय, पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीस ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगुले, अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, युवराज पाटील, आर. के. मोरे, एस. आर. पाटील, बाळासाहेब खाडे, अंबरिश घाटगे, कर्णसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.

आजी-माजी पालकमंत्री एकत्र

पालकमंत्री हसन मुश्रीफ दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत होते. ‘गोकुळ’च्या सभेत ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांच्या सोबत होते, त्याची चर्चा सभेच्या ठिकाणी होती.

बोक्यापासून सावध राहा

‘गोकुळ’च्या सभेत विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटलेच. सभेला पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील हेदेखील उपस्थित होते. महाडिक समर्थकांच्या वतीने ‘पालकमंत्री मुश्रीफसाहेबांचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात येत असतानाच विधानसभा निवडणुकीत बोक्यापासून सावध राहा, आपल्या सोबत महाडिकच असणार आहेत, असे कार्यकर्ते बोलत होते.

भविष्यकालीन योजना

भोकरपाडा येथील पंधरा एकर जागेसाठी प्रयत्न

गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा

सुरू करणे

वाशी येथे 15 मे. टन क्षमतेचा

दही प्रकल्प उभारणार

दूध पावडर, तूप व बटरची

निर्यात करणार.

मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखान्याचे नूतनीकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT