अक्षय शिंदे Pudhari File Photo
कोल्हापूर

बदलापूरच्या नराधम आरोपीचा एन्काऊंटर

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, यातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर आली आहे. जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसाकडील रिव्हॉल्व्हर हिसकावले असता पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये एक पोलिस अधिकारीही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, हा प्रकार म्हणजे आत्महत्या की एन्काऊंटर, असा मुद्दा चर्चिला जात आहे. तसेच, या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत.

ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाकडे आरोपी अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिस पथक तळोजा कारागृहात धडकले आणि आरोपी अक्षय शिंदे याला घेऊन ठाण्याकडे निघालेे होते. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपास टोल नाक्याच्या आसपास आरोपी अक्षय शिंदे याने सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांची पिस्तूल हिसकावून घेत तीन राऊंड फायर केले. दोन फायर हवेत झाडले, तर एक गोळी मोरे यांच्या पायावर लागली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी बरोबर अक्षयच्या डोक्याला लागली, तर दुसरी अन्यत्र लागली. त्याला कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अक्षयने झाडलेली गोळी मात्र एपीआय नीलेश मोरेंच्या पायाला लागली. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आधी अक्षयने आत्महत्या केल्याची बातमी पसरली. पाठोपाठ हे पोलिसांचेच एन्काऊंटर असल्याचे सांगितले जाऊ लागले. आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. हा आत्मरक्षणाच्या नावाखाली केलेला एन्काऊंटर आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. मृत अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनीही पोलिसांवर गंभीर आरोप करीत आमच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे.

पोलिस उपायुक्त करणार चौकशी

अक्षय शिंदे याच्या या संशयास्पद एन्काऊंटरची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिस उपायुक्त (अर्थ गुन्हे विभाग) पराग मनेरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

सीबीआयकडून चौकशी करा : अंधारे

अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अक्षयने स्वत:वर गोळी झाडली की आणखी काही दुसरे आहे? त्याला कोणी गोळी घातली की आणखी काही आहे? याची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पुरावे नष्ट करण्याचा प्रकार : वडेट्टीवार

या प्रकरणाचे धागेदोरे आरएसएसपर्यंत गेले आहेत. या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार तर नाही ना? याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे. आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

कोण आहे अक्षय शिंदे?

चोवीस वर्षीय अक्षय बदलापूरला शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता... शाळेत स्वच्छता ठेवण्याबरोबर मुलांना वॉशरूमला घेऊन जाण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते... अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

नेमके काय घडले?

1. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घडली घटना

2. मुंब्रा बायपासजवळून जात असताना आरोपी अक्षय याने एपीआय नीलेश मोरेंकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचले

3. नीलेश मोरे यांच्यावर केल्या 3 गोळ्या फायर

4. यातील एक गोळी नीलेश मोरेंच्या पायाला लागली

5. दोन गोळ्या झाडताना नेम चुकला

6. सोबत असलेल्या पथकातील एका पोलिस अधिकार्‍याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला

7. एपीआय नीलेश मोरे यांची प्रकृती गंभीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT