kolhapur | कर्मचार्‍यांची वानवा अन् साधनांचा तुटवडाउफाळला Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | कर्मचार्‍यांची वानवा अन् साधनांचा तुटवडा

पाणी बिले देणार कशी? : कोल्हापुरातील 20 हजारांवर ग्राहकांना सहा महिने बिलेच नाहीत

पुढारी वृत्तसेवा

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात गेल्या काही महिन्यांपासून गंभीर प्रशासनिक आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अपुरे कर्मचारी, मोबाईल प्रिंटरची कमतरता यामुळे 20 हजारांवर ग्राहकांना सहा महिने पाणी बिलेच दिलेली नाहीत. कर्मचार्‍यांची वानवा अन् साधनांचा तुटवडा आहे. मग, पाणी बिले देणार कुठून, अशी स्थिती आहे. यापुढे वितरित होणारी बिले दंडासह ऑपरेट होणार असल्याने शहरवासीयांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

निवृत्तीनंतर जागा रिक्तच...

पाणीपुरवठा विभागात 90 पेक्षा अधिक मीटर रिडर होते; दोन वर्षांत यापैकी जवळपास 30 ते 35 मीटर रिडर निवृत्त झाले आहेत. प्रशासनाने या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही. त्यामुळे अनेक प्रभागांत आता एकाच कर्मचार्‍यावर दोन ते तीन विभागांची जबाबदारी येत आहे. एका कर्मचार्‍याला दिवसात शेकडो नळ कनेक्शनची मीटर रीडिंग घ्यावी लागत आहेत. त्यातच बिल जनरेशन, वितरण आणि नागरिकांच्या तक्रारी यामुळे कामाचा ताण प्रचंड वाढला आहे.

मोबाईल प्रिंटरचा तुटवडा

सध्या पाणीपट्टीचे बिलिंग मोबाईल अ‍ॅप व प्रिंटरद्वारे केले जाते. मीटर रीडरकडे हँडहेल्ड डिव्हाईस असते, ज्याद्वारे ते मीटर रीडिंग घेतात आणि त्याच ठिकाणी बिल प्रिंट करून नागरिकांना देतात; मात्र महापालिकेकडे उपलब्ध मोबाईल प्रिंटरची संख्या अपुरी आहे. काही प्रिंटर दुरुस्तीसाठी गेलेले आहेत, तर काहींची बॅटरी निकामी झाली आहे. परिणामी, अनेक प्रभागांत मीटर रीडिंग घेतले असले, तरी बिल जनरेट होऊ शकलेले नाही. या तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण बिलिंग प्रक्रिया विस्कळीत झाली आहे.

महापालिकेच्या प्रणालीतील तांत्रिक त्रुटीही कारणीभूत

महापालिकेच्या बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचाही उल्लेख करण्यात येतो. सॉफ्टवेअर आणि प्रिंटर यांच्यातील समन्वयाचा अभाव, तसेच नेटवर्क समस्या यामुळेही बिल जनरेशनमध्ये अडथळे येतात. काही ठिकाणी रीडिंग डेटा योग्यप्रकारे सर्व्हरवर अपलोड होत नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया थांबते.

महसूल गळतीची चिंता

महापालिकेच्या पाणीपट्टीतून दर महिन्याला सरासरी 4 कोटी महसूल येतो; मात्र मागील दोन महिन्यांतील बीलिंगमध्ये अडचणी आल्याने महसूल संकलनात तब्बल 30 ते 40 टक्के घट झाल्याचे सांगण्यात आले.

अधिकार्‍यांची कबुली : ‘अडचणी आहेत, उपाययोजना सुरू’

‘काही मीटर रिडर निवृत्त झाल्यानंतर जागा रिक्त आहेत. मोबाईल प्रिंटरचा तुटवडा आहे. काही उपकरणे जुनाट झाली असून नवीन प्रिंटर खरेदीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारेल,’ अशी प्रतिक्रिया पाणी पुरवठा अधिकार्‍यांनी दिली; मात्र प्रत्यक्षात मागील सहा महिन्यांपासून समस्या कायम आहे आणि उपाययोजना केवळ कागदावरच दिसत असल्याचे दिसते.

‘कामाचा ताण असह्य!’

एका मीटर रीडरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आमच्यावर सध्या दोन-तीन विभागांचा भार आहे. दररोज शेकडो घरे कव्हर करावी लागतात. त्यात प्रिंटर व्यवस्थित काम करत नाहीत. काहींची बॅटरी संपते. वेळेत काम पूर्ण करणे अवघड जाते. साधनसामग्रीच उपलब्ध नाही, तर बिले जनरेट होणार कशी आणि ग्राहकांना पाणी बिले देणार कुठून?’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT