दिलीप भिसे
कोल्हापूर : मुंबई, पुण्यासह राज्यात सायबर गुन्हेगारी टोळ्यांनी कमालीची दहशत निर्माण केली आहे. कुख्यात टोळ्यांच्या कारनाम्यामुळे दोन वर्षांत समाजातील विविध घटकांना सुमारे 7 हजार 780 कोटींची झळ सोसावी लागली. 2024 मध्ये राज्यात 8 हजार 985 गुन्हे पोलिस दफ्तरी दाखल झाले आहेत. एक हजारावर गुन्हेगारांची जेलवारी झाली असली, तरी फसवणुकीचा टक्का मात्र दिवसागणीक वाढत असल्याचे चित्र आहे.
पुणे शहरात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पाठोपाठ मुंबईत वर्षभरात 4 हजार 849 गुन्हे रेकॉर्डवर आले आहेत. 780 भामट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आर्थिक राजधानी समजल्या जाणार्या महानगरात विविध घटकांसह निवृत्त, वयोवृद्धांची 890 कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक अहवाल आहे. पाठोपाठ ठाणे शहरात 695 गुन्ह्यांत 13 संशयित जेरबंद झाले आहेत. येथे 175 कोटींवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. नागपूरमध्येही 215 गुन्ह्यांत 65 कोटी रुपये बुडाले आहेत.
सायबर सुरक्षा पंधरवड्याला सुरुवात झाली आहे. देशभर विखुरलेल्या कुख्यात सायबर भामट्यांच्या टोळ्यांना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यात दक्षता पथकांच्या माध्यमातून कठोर उपाययोजना लागू करण्यात येत असल्या, तरी सायबर टोळ्यांच्या माध्यमातून होणारी फसवणूक समाजातील उद्योग-व्यावसायिकांसह ज्येष्ठ नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.
इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे समाजजीवन सुसह्य होत असतानाच देश-विदेशातील कुख्यात सायबर टोळ्यांनी सर्वत्र भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. 2024 मध्ये जगभरात 498 लाख कोटी रुपयांहून अधिक सायबर क्राईमद्वारे समाजातील विविध घटकांची फसवणूक झाली आहे. जगात सरासरी प्रतिसेकंदाला 1.65 कोटीची फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. 6 वर्षांत सायबर फसवणुकीच्या घटना 42 पटीने वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगारी ही अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.
सायबर टोळ्यांच्या डिजिटल अरेस्टच्या संभाव्य धोक्याला रोखण्यासाठी केंद्र सरकारने 6 लाख 70 हजार सिम कार्ड ब्लॉक केली आहेत. 60 हजारांवर व्हॉटस्अॅप, दोन हजारांवर स्काईप आयडीही ब्लॉक करण्यात आले आहेत. सायबर क्राईम सेल आणि पोलिस पथकांची सतर्कता, जागरूकतेमुळे 4 हजार 800 कोटी रुपये सुरक्षित राहिले आहेत. केंद्रीय गृहराज्य मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात ही माहिती नमूद केली आहे.
मोबाईलवर अॅप्लिकेशन कमी ठेवायला हवीत, लहान मुलांच्या हाती मोबाईल दिल्यास नळकत होणार्या तांत्रिक दोषामुळे गोपनीय माहिती उघड होऊ शकते. परिणामी, याद्वारेही सायबर अरेस्टचा धोका उद्भवू शकतो. क्यूआर कोड, अनोळखी लिंक डाऊनलोड करू नका, पासवर्ड फोनमध्ये सेव्ह करू नका, खासगी माहिती कोणाला देऊ नका, मोबाईलमध्ये बँक खात्यासह पासवर्डही सेव्ह होतो. त्यामुळे खात्यावरील रक्कम दुसर्याच्या खात्यावर वर्ग होण्याची भीती असते. सावधगिरी बाळगा, असे आवाहनही सायबर क्राईम सेलद्वारे करण्यात आले आहे.