कोल्हापूर : सोन्याच्या दागिन्यांसह गुंतवणूक केलेल्या रोख रकमेवर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने 37 लाख 72 हजार 400 रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी राजारामपुरी येथील जयश्री मोहन माजगावकर (रा. सुभाषनगर) हिच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
27 जुलै 2014 ते जून 2015 या काळात महाडिक वसाहत व भवानी मंडप येथे हा प्रकार घडला. ज्योती कृष्णा पाटील (52, रा. औदुंबर बंगला, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी) यांनी फिर्याद दाखल दिली आहे. त्या महिलेविरुद्ध यापूर्वीही जुना राजवाडा व राजारामपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड असून तिला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. त्या कालावधीत ज्योती पाटील, बहीण पल्लवी हांडे, मैत्रीण रूपा धोंड यांनी आमिषाला बळी पडून रोख 19 लाख रुपये, 17 लाख 86 हजार 400 रुपये किमतीचे 638 ग्रॅम सोन्याचे दागिने, 86 हजार रुपये किमतीची दोन किलो चांदी अशी एकूण 37 लाख 72 हजार 400 रुपयांची गुंतवणूक केली.
मुदतीनंतर मुद्दल, परतावा मिळण्यासाठी ज्योती पाटील यांच्यासह संबंधितांनी तगादा लावला. मात्र संशयित महिलेकडून टाळाटाळ होऊ लागल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फसवणुकीच्या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग असल्यास संबंधितांवर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येईल, असे तपास अधिकार्यांनी सांगितले.