सतीश सरीकर
कोल्हापूर : ‘दसरा-दिवाळी’ वर्षातील सर्वात मोठे सण. साहजिकच तेवढ्याच उत्साहात साजरे होणारे. मात्र त्याची आर्थिक तजवीज महिन्याला थोडी थोडी रक्कम साठवून केलेली. त्यासाठी भिशीतून होणारी साठवणूक. कोल्हापुरात दसरा-दिवाळीसाठी सुमारे सुमारे 100 कोटींपेक्षा जास्त फिरता निधी असतो. विशेष म्हणजे केवळ एकमेकांच्या विश्वासावर एवढी मोठी देवघेव सुरू असते. हजारो कुटुंबांना दसरा-दिवाळीसाठी भिशीचा आधार ठरत आहे. अनेकांसाठी भिशी ही ‘घरगुती आर्थिक योजना’ ठरत आहे.
सोने, कपडे, घराची सजावट, भेटवस्तू, गोडधोड यासाठी पैशांची चणचण भासू नये म्हणून अनेकजण वर्षभर भिशीच्या माध्यमातून बचत करतात. गल्ली भिशी, तालीम भिशी, कार्यालयीन भिशी, महिलांच्या भिशी तसेच मित्रमंडळींच्या विशेष भिशी अशा विविध प्रकारच्या भिशी लोकप्रिय आहेत. महिन्याला 500, 1000, 2000 किंवा 5000 रुपये अशी ठराविक रक्कम भिशीत टाकली जात आहे. दसरा-दिवाळीला संपूर्ण रक्कम संबंधिताला दिली जाते. छोटे बँकिंग असलेल्या भिशींचा वार्षिक निधी कोट्यवधींमध्ये पोहोचला आहे. काही भिशी तर गेल्या 50 ते 60 वर्षे सुरू आहेत.
भिशी ही केवळ आर्थिक व्यवहार न राहता सामाजिक जिव्हाळ्याचा भाग बनली आहे. कोल्हापुरातील भिशी संस्कृतीने कित्येक कुटुंबांच्या दिवाळीत उजेड पाडला आहे. भिशीची खरी ताकद म्हणजे सदस्यांमधील परस्पर विश्वास. व्यवहार कागदोपत्री नसले तरी विश्वासावर टिकतात. भिशी ही केवळ आर्थिक व्यवहार नाही, तर ग्रामीण आणि निम्न-मध्यमवर्गीय समाजासाठी ‘मिनी बँक’च आहे. अनेक जण ‘भिशीचा पैसा म्हणजे सणाची गोडी’ असे म्हणतात. त्यामुळे या पारंपरिक बचतीच्या माध्यमातून शहराची अर्थचक्रेही गतिमान होतात.
पूर्वी भिशी कागदावर नोंदवली जात होती, पण आता काळ बदलला आहे. मोबाईल आणि यूपीआयच्या युगात ‘ऑनलाईन भिशी’ सुरू झाल्या आहेत. गुगल पे, फोन पे किंवा बँक अॅप्सच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित केली जाते. काही गट व्हॉटस् अॅपवर भिशीचे व्यवस्थापन करतात. त्यात कोणाचा हप्ता भरला, कोणाला रक्कम मिळाली, हे सगळे पारदर्शकपणे दिसते. तरीही पारंपरिक ‘भिशीची बैठक’ संपलेली नाही. कारण त्या बैठकीत केवळ पैसे नाही तर चहाचा वास, गप्पा आणि हसण्या-खेळण्याची मजा असते.
कोल्हापुरातील महिला वर्गात भिशीची संकल्पना अत्यंत लोकप्रिय आहे. घरकाम करणार्या, लहान व्यावसायिक, कार्यालयीन कर्मचारी महिलांसह गृहिणी महिन्याला थोडी रक्कम बाजूला काढून भिशीत साठवतात. वर्षाअखेरीस मोठी रक्कम हातात येते. काही महिलांना भिशीतून छोट्या व्यवसायांना भांडवल दिले जाते. त्यामुळे अनेक महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे.