कुडाळ : घरापाठीमागील डबक्यात कपडे धुण्यासाठी गेलेला युवक आत्माराम शशिकांत राऊळ (31, रा. कविलगांव) यांचा डबक्यात तोल जाऊन पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 10 वा. घडली.
आत्माराम शशिकांत राऊळ हा युवक पत्नी तसेच दोन मुली यांच्यासह कुडाळ नाबरवाडी येथे राहत होता. तेथे तो गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करत असे व अधुन मधुन कविलगांव येथे मुळ घरी जात असे. चार दिवसांपूर्वी तो कविलगाव येथे आपल्या आईकडे राहण्यासाठी आला होता. त्याला आकडी येण्याची सवय होती. 3 जून रोजी त्याची आई सकाळी नेहमीप्रमाणे आपली कामे करून 7.45 वा. कामावर गेली होती. तर वडील घरातच होते. यानंतर आत्माराम हा सकाळी 10 वा.चे दरम्याने स्वतःचे कपडे धुण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या डबक्यात गेलेला होता. त्यावेळी तो तेथे पडलेला शेजारील व्यक्तीला आढळला. वडीलांना हे समजल्यावर त्यांनी येऊन त्याठिकाणी पाहिल्यावर तो कोणतीही हालचाल करत नव्हता. यावेळी तो मयत झाल्याच लक्षात आले. सहा. पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस कृष्णा परूळेकर व सुबोध मळगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची फिर्याद त्याची आई शुभांगी शशिकांत राऊळ (60, रा. कविलगाव) यांनी कुडाळ पोलिसात दिली. अधिक तपास पोलिस सचिन गवस करत आहेत, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.