माजी खा. विनायक राऊत यांच्याकडे व्यथा मांडतांना दत्तप्रसाद राऊळ, विठ्ठल नाईक, सुयोग पालव, राजेंद्र सरनोबात,दिनेश खोटावले आदी. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Goa ESMA Law Protest | गोवा शासनाने ‘एस्मा’ कायदा मागे घ्यावा

सिंधुदुर्गातील कामगारांची मागणी ; माजी खा. विनायक राऊत यांचे वेधले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : गोव्यात विविध आस्थापनांमध्ये, विशेषतः फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये काम करणार्‍या सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. गेल्या दोन वर्षांपासून गोवा सरकारने फार्मास्युटिकल कामगारांवर लावलेला एस्मा (एीीशपींळरश्र डर्शीींळलशी चरळपींशपरपलश अलीं) कायदा मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनाचे नेतृत्व गोवा येथे काम करणार्‍या महाराष्ट्रातील कामगारांनी केले. आंदोलकांनी सांगितले की, दोन-तीन वेळा आंदोलन करूनही गोवा सरकार आणि कंपनी व्यवस्थापन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. भाजप सरकार कंपनी व्यवस्थापनाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

सिप्ला, मार्कसन, तेवा यांसारख्या अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांना कामावरून काढले जात आहे. तसेच त्यांची बदली हिमाचल प्रदेश आणि सिक्कीमसारख्या राज्यांमध्ये केली जात आहे. कंपनीत कामगारांचा विनाकारण छळ केला जात असून, व्यवस्थापनाकडून विविध प्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोपही कामगारांनी केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून गोव्यातील भाजप सरकारने कामगारांवर जबरदस्तीने एस्मा कायदा लावून त्यांचा आंदोलनाचा हक्क हिरावून घेतला आहे. या कायद्याचा गैरवापर करून कंपन्या कामगारांना कामावरून काढत आहेत. याचा फटका सिंधुदुर्गातील 60 हून अधिक कामगारांना बसला असून, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. काहींची बदली राज्याबाहेर करण्यात आल्याने या कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

या अन्यायग्रस्त कामगारांनी भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाविरोधात लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या कामगारांनी माजी खा. विनायक राऊत आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांना पत्र लिहून याप्रकरणी लक्ष घालण्याची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.

आंदोलक कामगारांनी सांगितले की, त्यांना आशा आहे की, राऊत आणि राऊळ त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील. कामगार प्रतिनिधी म्हणून दत्तप्रसाद राऊळ, विठ्ठल नाईक, सुयोग पालव, राजेंद्र सरनोबात, दिनेश खोटावले यांनी विनायक राऊत यांची भेट घेऊन व्यथा मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT