देवगड ः वादळसद़ृश वातावरणाचा मोठा फटका मच्छीमारी व्यवसायाला बसला असून, मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून वादळी वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसाय वारंवार ठप्प होत आहे. यामुळे मासळीची आवकही घटल्याने मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या वादळाच्या सावटाचा परिणाम खोल समुद्रातील मच्छीमारीवर झाला असून, शेकडोहून अधिक नौका देवगड बंदरात स्थिरावल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यातही आणखी एका वादळाची शक्यता वर्तविली असल्याने मच्छीमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अवकाळी पाऊस व वादळसद़ृश वातावरण यामुळे देवगडचे अर्थकारण अवलंबून असणार्या आंबा व मच्छीमारी व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची चिंता मच्छीमार व बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असून, मच्छीमारांना समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे खोल समुद्रातील मच्छीमारी व्यवसाय पूर्णत: ठप्प आहे. वादळसद़ृश वातावरण व अवकाळी पाऊस यामुळे अर्थकारण अवलंबून असणारे आंबा व मच्छीमारी व्यवसाय अडचणीत आले आहेत. पाऊस लांबल्यामुळे मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता बागायतदारांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
मासळी हंगाम सुरू झाल्यानंतर समुद्री वादळांचे प्रमाणही वाढले यामुळे मच्छीमारी व्यवसावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या यांत्रिकी नौंकांद्वारे, न्हैय, कांडाळीद्वारे करण्यात येणारी मच्छिमारी बंद आहे.यांत्रिकी नौकांची मच्छिमारी तर गेले महिनाभर बंद आहे. समुद्रात पुन्हा 5 ते 9 नोव्हेंबरपर्यंत वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक मच्छिमार विकास कोयंडे यांनी दिली. यामुळे सद्यस्थितीत मासळी व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची शक्यता धुसर असून वातावरण निवळल्यानंतरच खोल समुद्रातील मच्छिमारी व्यवसायाला सुरूवात होईल, असे कोयंडे यांनी सांगीतले.