Sindhudurg rain 
सिंधुदुर्ग

Sindhudurg rain: दोडामार्गमध्ये मुसळधार! तिलारी धरण १०० टक्के भरले; धरणाचे दरवाजे उघडले

Sindhudurg Flood Alert: धरणातून सध्या १९.९४ घनमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग: तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणाची पाणीपातळी ११३.२० मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरण आता १०० टक्के भरले आहे. वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे दरवाजे उघडले असून, धरणातून सध्या १९.९४ घनमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, तेरवण मेढे येथील उन्नैयी बंधाऱ्यातून देखील १६.८४ घनमीटर प्रति सेकंद इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही स्रोतांमधून निघणारे पाणी तिलारी नदीला मिळत असल्याने नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तिलारी घाट रस्त्यांवर पाणी साचले

तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी (दि.३१) मुसळधार पाऊस कोसळला. सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी नाल्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे. तालुक्यासह तिलारी घाट परिसरात सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी पातळी वाढणार

तिलारी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून सर्व पाणी धरणात येत आहे. त्यामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिलारी प्रकल्प विभागाकडून नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहे की, नदीकाठच्या भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच अनावश्यकपणे नदी परिसरात जाणे टाळावे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत नदीचा प्रवाह अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT