कुडाळ : पत्रकार परिषदेत बोलताना माजी आ. वैभव नाईक. सोबत सतीश सावंत, संदेश पारकर, इर्शाद शेख आदी. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Agriculture Minister Protest | सिंधुदुर्गनगरीत 9 रोजी ‘कृषीमंत्री हटाव’ आंदोलन

फळपिक विमा भरपाईसाठी महाविकास आघाडी आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांना अजूनही फळपीक विम्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्यांना शेतकर्‍यांच्या वेदना कळत नाहीत अशा कृषी मंत्र्यांना हटवलेच पाहिजे,असा हल्लाबोल करत गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाव.. कृषीमंत्री हटाव’ धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा माजी आ. वैभव नाईक यांनी केली.

कुडाळ एमआयडीसी येथे महाविकास आघाडीच्या सोमवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत वैभव नाईक बोलत होते. ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख शिवाजी घोगळे, तसेच कृष्णा धुरी, बबन बोबाटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, नाझिर शेख, संदीप महाडेश्वर आदी उपस्थित होते.

आंदोलनात सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावे : वैभव नाईक

सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांनी गेली तीन-चार वर्षे विम्याचे हप्ते भरले, पण कंपन्यांनी एकदाही भरपाई दिलेली नाही. जून-जुलैमध्येच रक्कम मिळायला हवी होती, पण ऑक्टोबर आला तरी एक रुपया मिळालेला नाही, गतवर्षी आंदोलन केल्यावर काही रक्कम मिळाली होती. या वर्षी पालकमंत्र्यांनी स्वतः घेतलेल्या बैठकीचाही पाठपुरावा केलेला नाही. अधिकारी वर्गाने पालकमंत्र्यांनाच केराची टोपली दाखवली आहे. शेतकर्‍यांचा प्रश्न हा पक्षीय नाही, तर त्यांच्या हक्कांचा आहे. त्यामुळे सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.

कृषीमंत्र्यांचे विमा कंपनींवर नियंत्रण नाही : सतीश सावंत

सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्गातील 33 हजार 496 आंबा उत्पादकांनी 11 कोटी 50 लाख रुपये आणि 10 हजार काजू उत्पादकांनी 4 कोटी रुपये असे मिळून सुमारे 14 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. मात्र 30 जूनपूर्वी शेतकर्‍यांना मिळायला हवी असलेली भरपाई अद्याप मिळालेली नाही. विमा कंपनीकडून नुकसानग्रस्तांचा डाटा सुद्धा जाहीर झालेला नाही आणि बैठकींना प्रतिनिधी येत नाहीत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विभागावर नियंत्रणच नाही. म्हणूनच गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल वाजवो, कृषी मंत्री हटाव’ हे आंदोलन होणार आहे. दिवाळीपूर्वी पैसे मिळाले नाहीत, तर दिवाळीनंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही श्री. सावंत यांनी दिला.

सरकार फक्त धनदांडग्यांच; शेतकर्‍यांचं नाही : इर्शाद शेख

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, फळपिक विमा निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळेवर जमा केला जात नाही. परिणामी शेतकर्‍यांचा हक्काचा पैसा रखडतो. हे सरकार सर्वसामान्यांचं नसून धनदांडग्यांचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून न्याय मिळवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळा कनयाळकर यांनी सांगितले, विमा कंपनींची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हे आंदोलन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या लढ्यात ठामपणे सहभागी होईल असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT