ओरोस : ‘शक्तिपीठ’ महामार्ग निर्मितीत जी-जी व्यक्ती बाधित होईल, अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्ग बनवला जाणार आहे. आता असलेला शक्तिपीठ महामार्गाचा प्लॅन सिंधुदुर्गसाठी उपयोगाचा नाही, शक्तिपीठ महामार्गाचे टोक गोव्यात निघत असेल तर सिंधुदुर्गला याचा काय फायदा? म्हणूनच हा महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव येथून निघेल, असा प्लॅन तयार केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
पालकमंत्री नितेश राणे यांनी शक्तिपीठ महामार्गासंदर्भात गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकाराशी संवाद साधला. ते म्हणाले, शक्तिपीठ संदर्भात संबंधित अधिकार्यांची आणि माझी चर्चा झाली आहे. रस्ते महामंडळाच्या प्रमुखांशीही मी चर्चा केली आहे. या महामार्गाबाबत काहीजण सिंधुदुर्गवासीयांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महामार्गामुळे बाधित होणार्या प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच हा महामार्ग होणार आह, याची मी ग्वाही देतो. खा. नारायण राणे, जिल्हाधिकारी व मी अशी दोन आठवड्याअगोदर आमची बैठक झाली.
त्या बैठकीमध्येच आम्ही रस्ते विकास महामंडळ व अन्य अधिकार्यांना स्पष्ट भूमिका सांगितली आहे. लोकांना विश्वासात घेतल्यानंतरच सिंधुदुर्गात महामार्गाचे काम होईल, तसेच आम्हाला या महामार्गाच्या सिंधुदुर्गातील आराखड्याचे आणखी दोन-तीन प्लॅन दाखवा. कारण, महामार्गाचा सध्याचा जो काही प्लॅन आहे, त्याच्यामध्ये बांदा शहर आणि काही भाग बाधित होत आहे. शिवाय हा महामार्ग जर थेट गोव्याला मिळत असेल तर त्याचा सिंधुदुर्गला काहीही फायदा होणार नाही, ही बाब आम्ही संबधित अधिकार्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे.
या शिवाय महामार्ग प्राधिकरण किंवा रस्ते विकास महामंडळाकडे अजून काही प्लॅन असतील, तर ते त्यांनी सादर करावेत. ते प्लॅन सुयोग्य असतील तर त्यांचाही विचार केला जाईल, असे ना. राणे म्हणाले.
‘शक्तिपीठ’ महामार्गाचा प्लॅन हा सिंधुदुर्गच्या विकासासाठी पूरक ठरणार हवा, म्हणूनच ‘शक्तिपीठ’ महामार्गाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्लॅन आम्ही 101 टक्के बदलणार आहोत. त्यासंबंधी कॅबिनेटमध्येही आमची चर्चा झाली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकार्यांशीही चर्चा केली आहे. ‘शक्तिपीठ’ बाबत आम्हीही काही पर्याय सुचवलेले आहेत. यानुसार हा महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव येथून पुढे रेडी परिसरात कोस्टल रोडला जोडावा, अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.
सिंधुदुर्गातील लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे. त्यामुळे ज्यांना लोकांनी नाकारलेले आहे, घरी बसवलेले आहे, त्यांनी याबाबत चुकीची माहिती देऊन लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करू नये. ‘शक्तिपीठ’ महामार्गाबाबत विरोधकांचे काही प्रश्न, शंका असतील तर त्यांना सांगाव्यात. पालकमंत्री म्हणून त्यांच्याशी संवाद करायला मी कधीही उपलब्ध आहे. याप्रश्नी आंदोलन करणार्यांनी पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोलावे, त्यांच्या प्रश्न, शंकाचे समाधान केले जाईल, असे आवाहन ना. राणे यांनी यावेळी शक्तिपीठ विरोधकांना केले.