देवगड : हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत, देवगड किनारपट्टी सध्या समुद्राच्या रौद्ररूपाचा अनुभव घेत आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि किनार्यावर धडकणार्या साडेचार ते पाच मीटर उंचीच्या महाकाय लाटांनी किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत केले आहे. उधाणाच्या भरतीचे पाणी धोक्याची पातळी ओलांडून थेट मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका किनार्यालगत राहणार्या मच्छीमार बांधवांना बसला आहे.
समुद्राचे पाणी थेट झोपड्यांमध्ये शिरल्याने मासेमारीचे साहित्य, जाळी आणि इतर मौल्यवान वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. किनार्यावर नांगरून ठेवलेल्या अनेक होड्यांनाही या उधाणाचा धोका निर्माण झाला असून, त्या लाटांच्या तडाख्यात वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. देवगडमधील मळई येथील खाडीकिनारी तर परिस्थिती अधिकच गंभीर असून, पाणी थेट वस्तीजवळ पोहोचले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देवगडच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू आणि नगरसेवक रोहन खेडेकर यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक मच्छीमार नंदकिशोर भाबल आणि उमेश भाबल यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली. देवगड बंदरातील जेटीच्या सुरू असलेल्या कामामुळे पाण्याची पातळी वाढण्यास अधिकच मदत झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावेळी, मळई मशीद ते स्मशानभूमीपर्यंतच्या प्रलंबित रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, हीच परिस्थिती तारामुंबरी, मिठमुंबरी, मुणगे, विजयदुर्ग, गिर्ये आणि तांबळडेग यांसारख्या इतर किनारपट्टीच्या गावांमध्येही पाहायला मिळत आहे. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि समुद्रकिनारी जाणे पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कमी असला तरी, वार्याचा वेग आणि लाटांची उंची कायम असल्याने धोका टळलेला नाही.