सावंतवाडी : कोल्हापूर खंडपीठातील सुनावणीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा या रुग्णालयाला भेट देऊन येथील रुग्ण सुविधांची पाहणी केली. मात्र, आरोग्य सचिवांच्या या महत्त्वपूर्ण दौऱ्यापूर्वीच रुग्णालयाच्या 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार नसणे, तसेच सुविधा असूनही तंत्रज्ञ नसणे, अशा अनेक समस्या आहेत. या रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर याचिका दाखल असून, सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य शासनाला खडेबोल सुनावले आहेत. तसेच तथ्य शोध समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव व राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्र सिंह यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि समस्यांची माहिती घेतली. मात्र, आरोग्य सचिव रुग्णालयात असतानाच इकडे 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले.
या राजीनाम्याचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे. परंतु, वैद्यकीय सेवेवर सतत येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. राजीनामा देणारे हे सर्व डॉक्टर बीड तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून आणि त्यांना राज्य शासनाकडून खास सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमणुका देण्यात आल्या होत्या.
उच्च न्यायालयाची सुनावणी आणि आरोग्य सचिवांच्या भेटीनंतरही डॉक्टरांनी राजीनामे दिल्याने, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.अधीक्षकांनी दिला घटनेला दुजोरा
या घटनेबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांना विचारले असता, त्यांनी रूग्णालयातील 10 डॉक्टर्सनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. डॉ. ऐवाळे यांनी स्पष्ट केले की, या डॉक्टरांनी राजीनामा दिला असला ,तरी ते अजून एक महिना रुग्णालयात सेवा देणार आहेत. डॉक्टरांनी अचानक दिलेल्या या सामूहिक राजीनाम्यामुळे आरोग्य सचिवांच्या दौऱ्याचे महत्त्व आणि रुग्णालयातील तणाव अधिकच अधोरेखित झाला आहे.