सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा परिसरात पोलिसांनी मंगळवारी एका घरावर छापा टाकत घरातून तब्बल 80 किलो संशयित गोमांस जप्त केलेे. याप्रकरणी पोलिसांनी सर्फराज बाऊद्दिन ख्वाजा (वय 45), त्याची बहीण सनोबर बाऊद्दिन ख्वाजा (40) आणि आई हसीना बाऊद्दिन ख्वाजा (75) अशा तिघांवर गुन्हे दाखल केलेत.
सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई मंगळवारी सकाळी 11 वा. केली. यातील महिला संशयितांना नोटीस देऊन सोडले, तर मुख्य संशयित सर्फराज ख्वाजा याला अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सावंतवाडी पोलिसांना बाहेरचा वाडा येथे सर्फराज ख्वाजा याच्या घरात गोवंश सदृश्य मांस तसेच गांजा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 15 पोलिसांच्या पथकाने घरावर छापा टाकला.
दरम्यान पोलिसांना पाहून सर्फराज ख्वाजाच्या कुटुंबाने घराचा दरवाजा आतून बंद केला. पोलिसांनी संपूर्ण घराभोवती वेढा घालत परिसराची नाकाबंदी केली. त्यानंतर, पोलिसांनी व्हॅनवरील अनाउन्समेंट द्वारे कुटुंबाला दरवाजा उघडण्याचे आवाहन केले. दरवाजा न उघडल्यास दरवाजे-खिडक्या तोडून घरात प्रवेश करावा लागेल, असा इशारा दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच पोलिसांनी घरात जात संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. यावेळी घरातील एका मोठ्या डिप फ्रीजर मध्ये सुमारे 80 किलो गोवंश प्राण्याचे मांस आढळून आले. हे मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. घरात सापडलेला वजन काटा, प्लास्टिक पिशव्या, मांस कापण्याचा चाकू आणि मोठा फ्रीजर यावरून याची पुष्टी झाल्याचे पोलिसांनी सांगितलेे.
सावंतवाडीचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शरद अस्वले यांनी पहाणी करून सदर मांस हे गोमांस असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या समक्ष पंचनामा करत हे मांस आणि अन्य साहित्य जप्त केले.ही कारवाई दोन तासांहून अधिक वेळ सुरू होती. त्यामुळे परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
या प्रकरणी सर्फराज बाऊद्दिन ख्वाजा, याच्यासह त्याची बहीण सनोबर ख्वाजा आणि आई हसीना ख्वाजा यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्फराज याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हे मांस त्याने नेमके कुठून आणले?, कोणाकडून आणले? याबाबतची माहिती संशयिताकडून घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी सांगितले.
संशयित सर्फराज ख्वाजा याच्यावर गोवंशसदृश मांस बाळगल्याप्रकरणी सात महिन्यांपूर्वी कारवाई होऊन गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी, मार्च महिन्यात सावंतवाडी पोलिसांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या मदतीने थरारक पाठलाग करत त्याला माडखोल येथे ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्या खासगी कारमधून 130 किलो गोमांस जप्त करण्यात आले होते.