मडुरा : कास - सातोसे भागात ‘ओंकार’ नामक टस्कर हत्ती सध्या धुमाकूळ घालत आहे. त्याने भातशेतीसह केळी, नारळ, पोफळी बागायतीचेही अतोनात नुकसान सुरू आहे. या प्रश्नी कास ग्रामस्थांनी जिल्हा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांची भेट घेत विचारणा केली. हत्ती पकड मोहिमेची जय्यत तयारी सुरू असून ‘वनतारा’ ची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत‘ओंकार’ हत्तीची पकड मोहीम पूर्ण होईल, असा विश्वास श्री. शर्मा यांनी यावेळी कास ग्रामस्थांना दिला.
‘ओंकार’ हत्ती सध्या सातोसे, मडूरा, कास गावात स्थिरावला असून, तो भातशेती, केळी, नारळ, पोफळी बागायतींमध्ये धुमाकूळ घालत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी हत्ती पकड मोहिमेची पाहणीसाठी कास गावात आलेले जिल्हा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. हत्ती पकड मोहिमेसंदर्भात नेमकी काय कार्यवाही सुरू आहे? असा सवाल रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केला. यावर मिलीश शर्मा यांनी हत्ती पकड मोहीमसाठी ‘वनतारा’ची खास प्रशिक्षित टीम दाखल झाली आहे. त्यांचे नियोजन सुरू आहे.
येत्या दोन - तीन दिवसात ‘ओंकार’ हत्तीला पकडण्यात येईल. हत्ती हा ताकदवान व वजनदार प्राणी असल्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवताना पूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षित कर्मचार्यांची टीम घटनास्थळी अभ्यास करत आहे. अशी माहिती उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिली. हत्तीकडून होणार्या नुकसानी बाबत सरपंच प्रवीण पंडित यांनी त्यांचे लक्ष वेधले.
गावात लहान मुले विनाकारण हत्ती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ही खूप धोक्याची बाब आहे. हत्ती आक्रमक झाल्यास त्याला रोखणे अशक्य आहे. त्यामुळ लहान मुले, वृद्धांना हत्ती पाहण्यासाठी येऊ नये, यासाठी जनजागृती करा, अशी विनंती मिलीश कुमार यांनी केली.
वन विभागाचे कर्मचारी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या घरी जाऊन कागदपत्रे जमा करतील. सामाईक क्षेत्रासाठी शेतकर्यांचे हमीपत्र घेऊन त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. ई-पीक नोंदणीत संबंधित पिकाची नोंद नसेल तर महसूल विभागाकडून नोंदणी करून घेऊ. सत्य परिस्थिती पाहून पंचनामे करण्याचे आदेश आपण वन कर्मचार्यांना दिले आहेत. सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई दिली जाईल.मिलीश शर्मा, जिल्हा उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग