खाण्यासाठी शेती भागात फिरत असताना ओंकार हत्ती. (Pudhari File)
सिंधुदुर्ग

Omkar Elephant | ओंकार हत्ती पुन्हा कडशी-मोपा परिसरात

सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवर वारंवार फेरफटका मारणारा ‘ओंकार’ हत्ती पुन्हा एकदा कडशी-मोपा परिसरात दिसून आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

बांदा : सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवर वारंवार फेरफटका मारणारा ‘ओंकार’ हत्ती पुन्हा एकदा कडशी-मोपा परिसरात दिसून आला आहे. त्याच्या हालचालींमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र महाराष्ट्र आणि गोवा वनविभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ओंकारला मूळ अधिवासात परत पाठविण्याचे प्रयत्न अद्यापही यशस्वी ठरलेले नाहीत.

ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम

महाराष्ट्र वनविभागाची टीम ओंकारच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवत असून ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेत आहे. काल रात्रीपासून पहाटे तीन वाजेपर्यंत ओंकारचे लोकेशन मिळाले नव्हते. अखेर पहाटे ड्रोनच्या मदतीने तो गोव्यातील तोरसे परिसरातील नदीकिनारी असल्याचे स्पष्ट झाले.

मात्र गोवा वनविभागाकडून ठोस माहिती न मिळाल्याने आणि त्यांची यंत्रणा तुलनेने अपुरी असल्याने शोधमोहीमेत अडथळे निर्माण होत आहेत.

वनविभागाचे प्रयत्न

हत्तीच्या हालचालींची माहिती मिळताच गोवा वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हत्तीला सुरक्षितपणे जंगलाकडे परत पाठवण्यासाठी विविध शक्कली लढवण्यात येत आहेत. ढोल वाजवणे, फटाके फोडणे, वाहनांचे हॉर्न वाजवणे अशा उपायांनी प्रयत्न सुरू ठेवले गेले. मात्र हत्ती वारंवार दिशा बदलत असल्याने कारवाईला वेळ लागत आहे.

सिंधुदुर्ग वनविभागाची टीम आपल्या अनुभवाच्या जोरावर परिस्थिती हाताळत आहे. वरिष्ठ पातळीवर मार्गदर्शन घेतले जात असून, नियोजनबद्ध पद्धतीने हालचाली सुरू आहेत. मात्र गोवा वनविभागाला हत्ती व्यवस्थापनाचा अनुभव कमी असल्याने ते काही अंशी मागे पडले आहेत. त्यामुळे हत्तीला हुसकावण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतींमुळे तो आक्रमक होण्याची शक्यता असून, नागरिकांसाठी धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

गोवा वनविभागाची प्रतिक्रिया

गोवा वनविभागाचे अधिकारी जीस वर्की यांनी सांगितले की, ओंकार हत्तीला सतत हालचाल करत असल्यामुळे पकडणे कठीण झाले आहे. त्याला मूळ अधिवासात परत पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र महाराष्ट्र आणि गोवा वनविभागांचा अधिक समन्वय होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामस्थांची मागणी व प्रशासनाचे आवाहन

ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. हत्ती आमच्या शेतीमालाला व जनावरांना धोका निर्माण करतोय. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फिरणे धोकादायक ठरत आहे, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

गावकर्‍यांची चिंता आणि नागरिकांची गर्दी

ओंकारच्या उपस्थितीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. भातशेती, भाज्या आणि फळबागांचे नुकसान वाढत असल्याने ग्रामस्थ सतत भीतीच्या छायेत राहत आहेत. दुसरीकडे, हत्तीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक मात्र मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. त्यामुळे कुतूहल आणि धोका दोन्ही वाढले आहेत. बुधवार सकाळपासून उशिरापर्यंत तोरसे परिसरात ओंकार हत्ती फिरताना दिसला. शेतजमिनीच्या कडेला, रस्त्यालगत आणि घरांच्या जवळ त्याची वावर दिसताच ग्रामस्थांची पळापळ उडाली. विशेषतः महिला व शालेय मुले भयभीत होऊन घराबाहेर न पडता घरातच थांबली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT