सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील मोती तलावाच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर शेवाळ साचल्याने तो धोकादायक बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून यावरून घसरून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. यात माजी नगरसेवक सुरेश भोगटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सत्यजीत देशमुख यांचाही समावेश आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या गंभीर बनली असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गेले काही दिवस मोती तलावाच्या फुटपाथवर शेवाळ जमले आहे. त्यामुळे सकाळी फिरण्यासाठी येणार्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. अनेकजण यावरून घसरून पडले आहेत आणि त्यांना दुखापत झाली आहे. काल (बुधवारी) माजी नगरसेवक सुरेश भोगटे हे सकाळी फिरताना पाय घसरून पडले, ज्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. तर गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे सत्यजीत देशमुख हे देखील याच ठिकाणी घसरून जखमी झाले.या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आज सकाळी सावंतवाडी नगरपरिषदेत धाव घेतली. त्यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर जोरदार टीका केली. यापूर्वीही अनेक महिला या फुटपाथवरून घसरून पडल्याच्या घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
तीन मुशी येथे बस पकडतानाही काही महिला अशाच प्रकारे जखमी झाल्या होत्या. गुरुवारी सकाळी देखील दोन ते तीन नागरिक याच फुटपाथवरून घसरले, तर अनेकजण पडता पडता वाचले. माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी याबद्दल माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयाकडून बसस्थानकाकडे जाणार्या काही महिलांनाही याचा फटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी 8.30 वा. मॉर्निंग वॉक करणार्या नागरिकांनी नगरपालिकेच्या कार्यालयावर धडक दिली आणि अधिकार्यांना जाब विचारला. सुरेश भोगटे, महेश नार्वेकर, सत्यजीत देशमुख, विकास नेरूळकर, संदीप धारगळकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या तीव्र नाराजीनंतर नगरपरिषद अधिकार्यांनी तत्काळ या फुटपाथवर ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.