सावंतवाडी : भरधाव ब्रेझा कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर माजगाव तांबळगोठण येथे बुधवारी दुपारी 3 वा. घडला. फारूक हेरेकर (वय 50, रा. माजगाव गरड) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचाराकरिता त्याला गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले.
जखमी फारुख हा आपल्या दुचाकीने माजगाव ते बांदा जात होता, याच दरम्यान बांद्यावरून सावंतवाडीच्या दिशेने यश आनंद पडते (27, रा. शिरोडा नाका) हा ब्रेझा कार भरधाव वेगाने चालवत येत होता. माजगाव- तांबळगोठण येथे वळणावर वेगात असलेल्या ब्रेजा कारने समोरून येणाऱ्या फारुक याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत फारुख हा रस्त्यावर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जमलेल्या नागरिकांनी जखमीला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.कारची धडक एवढी जोरात होती की अपघात स्थळावरून कारने दुचाकीला तब्बल 100 मीटर पेक्षा जास्त फरफटत नेले.
यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारच्याही दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळतात सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हेडकॉन्स्टेबल महेश जाधव व श्री.गावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. जखमी श्री.फारुख याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचार करता त्याला गोवा बांबुळी रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या अपघाताबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.