प्रमोद म्हाडगुत
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. गतवेळच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत शिवसेनेचा दबदबा होता. जि.प.च्या 9 पैकी तब्बल 6 जागा शिवसेनेच्या खात्यात गेल्या, तर भाजपकडे जि.प.च्या 3 जागा होत्या. यंदा आरक्षणात झालेल्या फेरबदलामुळे अनेक बड्या नेत्यांचे स्वप्न भंगले असून, काही नव्या चेहऱ्यांसाठी अनपेक्षित संधीचे दारे उघडली आहेत.
आंब्रड, ओरोस, पावशी, घावनळे, पिंगुळी, वेताळबांबर्डे, नेरुर, तेंडोली व माणगाव या नऊजि. प. गटा पैकी तीन महिला राखीव आणि तीन सर्वसाधारण खुले झाल्याने अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांचे तिकीट आपोआप रद्द झाले आहे. मागील निवडणुकीत विजयी झालेले नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, राजू कविटकर, रणजीत देसाई, वर्षा कुडाळकर, लॉरेन्स मान्येकर, अंकुश जाधव, अनुपस्थिती खोचरे यांच्यापैकी नागेंद्र परब आणि अमरसेन सावंत वगळता इतरांना त्यांच्या पारंपरिक प्रभागांतून उमेदवारीची संधी मिळणे कठीण आहे.यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व निराशेचे वातावरण आहे.
याउलट, काही महिला नेत्यांसाठी ही सोडत लकी ड्रॉ ठरली आहे तेंडोली, आंब्रड व ओरोस बुद्रुक हे गट सर्वसाधारण महिला राखीव ठरल्याने वर्षा कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते आणि संध्या तेरसे या इच्छुक महिला कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी आहे. पं. स. गण आरक्षणातही पिंगुळी, वेताळबांबर्डे, नेरूर उत्तर व नेरूर दक्षिण या सर्वसाधारण महिला राखीव जागा ठरल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.
शिवसेना फुटीनंतर कुडाळ तालुक्यात होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आ. नीलेश राणे यांनी जि. प. वर भगवा फडकविण्याचे लक्ष्य ठेवून तालुकाभर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे, केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपनेही आपली संघटनात्मक ताकद दाखविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते, माजी आ. वैभव नाईक गावागावात बैठका घेत आपला पारंपरिक मतदार टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुडाळ तालुक्यात काँग्रेस, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस,अजित पवार राष्ट्रवादी आणि मनसे यांची संघटनात्मक ताकद तुलनेने कमी असली,तरी त्यांच्या मतदारांची उपस्थिती काही प्रभागांमध्ये निर्णायक ठरू शकते.या मतदारांचा कल कोणत्या गटाकडे वळतो, यावर काही जागांचा निकाल अवलंबून राहणार आहे.
कुडाळ पंचायत समितीच्या 18 जागांपैकी अनु.जाती, नामाप्र, सर्वसाधारण महिला आणि खुल्या अशा आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना राजकारणात संधी मिळाली आहे. पावशी (अनु.महिला), घावनळे (नामाप्र महिला), गोठोस (नामाप्र महिला) आणि आंब्रड (नामाप्र) या जागांमुळे तरुण महिला कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी आहे.मागील कार्यकाळात शिवसेनेचे 11 व भाजपचे 7 सदस्य होते; परंतु पक्षफुटीनंतर भाजपचा प्रभाव वाढला होता.आता नव्या आरक्षणामुळे दोन्ही पक्षांना नवे गणित जुळवावे लागणार आहे.
पंचायत समिती गण आरक्षणात माजी सभापती नूतन आईर, माजी उपसभापती श्रेया परब, अरविंद सावंत, आर.के. सावंत, अतुल बंगे, संदेश नाईक, मिलिंद नाईक, सुप्रिया वालावलकर, जयभारत पालव, अनघा तेंडुलकर, सुबोध माधव, मथुरा राऊळ, शीतल कल्याणकर, प्राजक्ता प्रभू या माजी सदस्यांपैकी काहींना आरक्षणाची लॉटरी लागली,तर काहींचा पत्ता कट झाला आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला मोर्चा अध्यक्षा संध्या तेरसे,जान्हवी पालव, अजय आकेरकर, राजन परब, योगेश बेळणेकर, रुपेश कानडे, दादा साईल, रूपेश पावसकर, शेखर गावडे, कृष्णा धुरी, आरती पाटील, श्रीपाद तवटे आदी नवोदित कार्यकर्त्यांची नावे चर्चेत आहेत.
कुडाळ तालुक्यातील पारंपरिक शिवसेना-भाजप मतदारवर्ग, शिवसेना फुटीनंतरची नवी समीकरणे आणि महिला आरक्षणामुळे निर्माण झालेला नव्या चेहऱ्यांचा प्रभाव या साऱ्याचा संगम यंदाच्या निवडणुकीला अधिक चुरशीचा रंग देणार आहे. शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि भाजप या तिन्ही मध्ये तिरंगी लढत होते कि मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट व भाजप एकत्र लढते हे पाहणेऔत्सुक्याचे आहे.