सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघात दाखल झालेल्या एकूण 34 उमेदवारी अर्जांपैकी बुधवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत एकूण 28 अर्ज वैध ठरले तर 6 अर्ज अवैध ठरले. यामध्ये कणकवलीत दाखल 8 उमेदवारांचे 9 पैकी 9अर्ज वैध, कुडाळ 11 पैकी 1 अवैध तर सावंतवाडीत 14 पैकी 9 वैध तर 5 अर्ज अवैध ठरले.
4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतरच कितीजण निवडणूक रिंगणात कायम राहतात, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीत कणकवली मतदारसंघात ठाकरे शिवसेना विरुद्ध भाजप, कुडाळात ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना तर सावंतवाडीत चौरंगी लढतीचे चित्र आहे.(Maharashtra assembly poll)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 22 ते 29 ऑक्टोबर असा होता. अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात आली असून बुधवारी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया तिन्ही मतदारसंघातील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकार्यांनी पूर्ण केली आहे. कुडाळ वगळता इतर ठिकाणी शांततेत छाननी प्रक्रिया पार पडली.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून 8 उमेदवारांनी 9 नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. उमेदवारांनी भरलेले सर्व नामनिर्देशन पत्र छाननी दरम्यान वैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात आता 8 उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.
कणकवली विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पार्टीचे नितेश नारायण राणे, शिवसेना उबाठा पक्षाचे संदेश भास्कर पारकर, अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम व बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव, अपक्ष गणेश माने हे उमेदवार रिंगणात उभे आहेत.(Maharashtra assembly poll)
कुडाळ मतदारसंघासाठी महाविकास आघाडी, महायुती, बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, रासप या पक्षांसह अपक्ष मिळून एकूण 8 जणांनी 11 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील मुंबईस्थित अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने 7 जणांचे 10 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, रासपच्या महिला उमेदवार उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) यांच्या उमेदवारी अर्जातील एबी फॉर्ममध्ये त्रुटी असल्यामुळे त्या पक्षातर्फे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकत नाहीत, मात्र त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात, असे निवडणूक निर्णय अधिकारी काळुशे यांनी सांगितले.
सावंतवाडी मतदारसंघात एकूण दाखल 14 अर्जांपैकी छाननीमध्ये 9 अर्ज वैध ठरले आहेत.छाननीमध्ये कोणीही कोणाच्याही उमेदवारीवर हरकत घेतली नाही. मात्र, तांत्रिक बाबींमुळे पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले. यात अर्चना घारे -परब यांनी राष्ट्रवादी पक्षातर्फे दाखल केलेला उमेदवारी अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरला. तर त्यांनी सादर केलेले दोन्ही अपक्ष उमेदवारी अर्ज मात्र वैध ठरले. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी पक्षातर्फे सादर केलेले दोन्ही अर्ज वैध ठरले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी पक्षातर्फे व अपक्ष मिळून भरलेले दोन्ही अर्ज वैध ठरले. तर केसरकर यांच्यातर्फे त्यांची मुलगी सोनाली केसरकर तिने भरलेला डमी अर्ज एबी फॉर्मअभावी अवैध ठरला. तसेच प्रथमेश तेली यांचाही अर्ज एबी फॉर्मअभावी अवैध ठरला. शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रवीण बाबली परब यांनी अर्जासोबत आवश्यक 10 सूचक न दिल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला. तसेच दुसरे अपक्ष उमेदवार देवदत्त गावडे यांनी 10 सूचक दिलेले असताना त्यांच्या एका सूचकाचे नाव मतदारयादीत आढळून आले नसल्याने त्यांचाही अर्ज अवैध ठरला. अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयात पार पडली.(Maharashtra assembly poll)