सिंधुदुर्गात खतांचा तुटवडा! 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात खतांचा तुटवडा!

‘पॉस’ मशिनमध्ये नोंदणी न केल्याने समस्या ः शेतकर्‍यांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा
अजित सावंत

कणकवली ः सिंधुदुर्गात भात लावणीचा हंगाम सुरू झाला असताना जिल्ह्याच्या अनेक भागांत खतांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. ऐन हंगामात खत उपलब्ध होत नसल्याने बळीराजाला खतासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता जिल्ह्यात खताचा तुटवडा तांत्रिक कारणांमुळे निर्माण झाला आहे.

खत विक्री लायसनधारकांनी खत विक्रीची नोंद ‘पॉस’ मशिनवर ऑनलाईन करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक विक्रेते ‘पॉस’वर नोंदणी करत नसल्याने खताचा साठा शिल्लक असल्याचे खत कंपन्यांना दिसते. दुसरीकडे अनेक लायसनधारक लायसन नूतनीकरण करत नसल्याने त्यांना पॉस मशिनवर नोंदणी करता येत नाही. तसेच ग्रामीण भागात नेटवर्कचीही समस्या असते. या सर्वाचा फटका मात्र जिल्हयातील शेतकर्‍यांना बसला आहे.

सिंधुदुर्ग हा कृषीप्रधान जिल्हा आहे. भातशेती हे जिल्हयाचे प्रमुख पीक आहे. खरिप हंगामात भातशेतीसाठी मोठ्या प्रमाणावर युरिया, संयुक्त आणि मिश्र खताची आवश्यकता असते. भातशेती बरोबरच आंबा, काजू यासारख्या फळबागायतीसाठी खताची मोठी मागणी असते. त्यासाठी कृषी विभागाकडून संबंधित खत विक्री लायसन धारकांद्वारे खताची मागणी नोंदवून नियोजन केले जाते. आरसीएफ, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ, पारादीप फॉस्फेट यासारख्या कंपन्या जिल्हयाला खत पुरवठा करतात. तालुकास्तरावर शेतकरी संघांकडे हे खत उपलब्ध होते. त्यानंतर गावागावातील सहकारी सोसायट्या, कृषी सेवा केंद्रे आणि तत्सम लायसनधारक यांना खत पुरवठा केला जातो. सिंधुदुर्गात सर्वसाधारणपणे साडेचौदा हजार टन ते 15 हजार टन खताची मागणी असते. यामध्ये सुमारे साडेचार हजार ते साडेपाच हजार टन युरिया खताची मागणी असते. सिंधुदुर्गचा विचार करता एप्रिल ते जून महिन्यातील मंजूर कोट्याच्या दीडपट खत यंदा उपलब्ध झाले होते. 23 जून पर्यंत सिंधुुदुर्गला सुमारे 3,600 टन युरिया खत उपलब्ध झाले होते तर नुकतेच आणखी एक हजार टन युरिया खत उपलब्ध झाल्याची माहिती आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्हयाच्या अनेक भागात खताची मागणी असूनही खताचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहेत. शेतकर्‍यांची मागणी असूनही खत उपलब्ध होत नाही. काही ठिकाणी खतविक्रीच्या दुकानांवर अजूनही रांगा लागल्याचे पाहायला मिळते. ऐन भात लावणीच्या हंगामात खताचा तुटवडा नेमका कशामुळे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत कृषी विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता जिल्हयात खताचा तुटवडा हा तांत्रिक कारणामुळे निर्माण झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. केंद्र शासनाकडून शेतकर्‍यांना अनुदानावर खत पुरवठा केला जातो. खताच्या विक्रीमध्ये पारदर्शकता यावी, शेतकर्‍यांना दर्जेदार खत उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने खताच्या विक्रीची नोंद ऑनलाईन करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी संबंधित शेतकर्‍याचे आधारकार्ड आवश्यक असते. खत विक्री लायसन धारकांकडे त्यासाठी पॉस मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशिनवर थम्ब लावून खत विक्रीची नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र जिल्हयातील अनेक लायसन धारकांनी पॉस मशिनवर या खत विक्रीची नोंदच केले नसल्याचे पुढे आले आहे. पॉस मशिनवर थम्ब लावून ऑनलाईन नोंदणी न झाल्याने संबंधित खत विक्री धारकांकडे खताचा साठा संपूनही खताचा साठा उपलब्ध असल्याचे दिसते. जोपर्यंत ऑनलाईनवर साठा संपल्याचे दिसत नाही, तोपर्यंत संबंधित कंपनीला खत पुरवठा करता येत नाही, असे कृषी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

मध्यंतरी जिल्हयात युरिया खताचा साठा संपूनही ऑनलाईनला सुमारे 1200 टन साठा उपलब्ध असल्याचे कंपनीला दिसले होते. जोपर्यंत पॉस मशिनवर खत विक्रीची नोंद होत नाही, तोपर्यंत मागणीनूसार पुरवठा होणार नाही, हे वास्तव आहे. दुसरीकडे पॉस मशिनवर लायसन धारक नोंद का करत नाहीत? याचे कारण विचारले असता अनेक लायसनधारकांनी त्यांच्या लायसनचे नुतनीकरण केलेले नाही. जोपर्यंत लायसनचे नुतनीकरण होत नाही तोपर्यंत पॉस मशिनवर नोंदणी करता येत नाही. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने पॉस मशिनवर नोंदणीस अडचण येते हेही कारण आहे. याबाबत तालुका आणि पंचायत समिती कृषी विभागामार्फत खत विक्रीच्या लायसन धारकांना त्यांचे लायसन नुतनीकरण करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात आले. यासाठी कॅम्प आयोजनाबाबतही चर्चा झाली आहे. या सार्‍या तांत्रिक अडचणीमुळे जिल्हयाला खताचा तुटवडा जाणवत आहे. मात्र काही असले तरी जिल्हयातील शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. आता भात लावणीचा हंगाम सुरू झाला असून खताची मागणी वाढली आहे. याबाबत कृषी विभागाने समन्वय साधून ही तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करत शेतकर्‍यांना दिलासा देणे आवश्यक आहे.

दरम्यान, वैभववाडी तालुक्यातील कुर्ली सोसायटीचे चेअरमन मोहन पडवळ यांनी खत तुटवडा असल्याची वस्तुस्थिती आहे. जी काही तांत्रिक अडचण आहे ती प्रशासनाने दूर करून शेतकर्‍यांना दिलासा देणे आवश्यक आहे. मुळात खताचा पुरवठा हा मे महिन्यातच होणे आवश्यक आहे. यंदा खत पुरवठा थोडासा विलंबाने झाल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT