शेतकऱ्यांना 90 कोटींची पीक विमा रक्कम वाटप File Photo
सिंधुदुर्ग

Farmers Crop Insurance | शेतकऱ्यांना 90 कोटींची पीक विमा रक्कम वाटप

जिल्ह्यातील 43 हजार नुकसानग्रस्तांना लाभ

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या विद्यमाने राबविण्यात आलेल्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना ‌‘आंबीया बहार-2024-25‌’अंतर्गत विमा नुकसानभरपाई रकमेचे वितरण सुरू झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यातील 43 हजार शेतकरी पात्र असून, त्यांसाठी 90 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात 15 शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रकमा जमा होणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट करत विमा कंपनीने यापुढे अशी दिरंगाई न करता ठरलेल्या वेळेतच रकमा जमा करावी, अशा सक्त सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

सिंधुदुर्गनगरी येथे परिषद सभागृहात पीक विमा रक्कम वितरण कार्यक्रम झाला. यावेळी स्वीडन दौऱ्यावर असलेले पालकमंत्री नितेश राणे यांनी या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक-नवरे, भारतीय कृषी विमा कंपनीचे डेप्युटी मॅनेजर श्री. प्रभाकर, श्री. कुंभारे व अन्य अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

90 कोटींची नुकसानभरपाई

पालकमंत्री राणे म्हणाले, जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच 43 हजार शेतकऱ्यांना पीक विमा रकमेपोटी 90 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक आणि राज्य कृषी मंत्री व अन्य नेत्यांनी सहकार्य केले. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यातील 43 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन टप्प्यांमध्ये नुकसानीची रक्कम दिवाळीपूर्वी जमा होईल.

दरम्यान राज्य सरकारने भारतीय कृषी विमा कंपनी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु कंपनीची यापुढील भूमिका योग्य राहिल्यास, या निर्णयावर शासन फेरविचार करेल, मात्र या पुढे शेतकऱ्यांना पिक विमा रक्कमा वेळच्यावेळी मिळाली पाहिजे.

2011-12 पासून योजनेची अंमलबजावणी

अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या, जिल्ह्यात पिक विमा कंपनी सन 2011-12 पासून फळ पीक विमा राबवत आहे. आंबा आणि काजू बागायतदार असलेल्या एकूण 43 हजार 219 शेतकऱ्यांनी सन 2024-25 साठी 13 कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता. यात 17 हजार 577 हेक्टर क्षेत्र पीक विमा भरपाईसाठी पात्र ठरले आहे. एकूण 90 कोटींची नुकसान भरपाई लवकरच वितरित होणार आहे.

विमा कंपनीचे डेप्युटी मॅनेजर प्रभाकर म्हणाले, आपण आठ राज्यांची जबाबदारी सांभाळत आहे. या जबाबदारीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्गसह राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान पाहता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला 90 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

धनादेश वितरण करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची नावे

प्रभाकर राजाराम देसाई (तळकट, ता. दोडामार्ग), सोना संदेश चव्हाण (कणकवली), विजय पंढरीनाथ तावडे (कणकवली), मानवेल जॉन डिसोजा (ओरोस बु.), अशोक हरी गांवकर (ओरोस बु.), मधुकर नारायण सावंत (ओरोस बु.), लक्ष्मण सिताराम परब (ओरोस बु.), वामन पांडुरंग परब (पेंडूर,ता. मालवण), रवींद्र सिताराम शिरसाट (पेंडूर, ता. मालवण), दत्ताराम राजाराम परब (मडुरा, ता. सावंतवाडी), ज्ञानेश पांडुरंग परब, (मडुरा, ता. सावंतवाडी), साबाजी सोम परब (मडुरा, ता. सावंतवाडी), विरोचन विजय धुरी (वेतोरे , ता. वेंगुर्ला), प्रकाश महादेव गावडे (वेतोर, ता. वेंगुर्ला), रमेश गोविंद महाडिक (फणसगाव, ता. देवगड), दिगंबर लक्ष्मण गाडगीळ (वेतोरे, ता. वेंगुर्ला), विवेकानंद बळीराम बालम (कसाल, ता. कुडाळ).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT