कुडाळ: ज्या बैलाच्या आक्रमक स्वभावाला कंटाळून त्याला विकण्याचा निर्णय घेतला, त्याच बैलाने आपल्या मालकिणीचा जीव घेतल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना कुडाळ-मधली कुंभारवाडी येथे घडली आहे. पुष्पलता रामचंद्र मांजरेकर (वय 70) असे या दुर्दैवी वृद्धेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. पुष्पलता मांजरेकर या कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या मातोश्री होत.
ही दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. मांजरेकर कुटुंबीयांनी महिन्याभरापूर्वीच हा बैल विकत घेतला होता. मात्र, त्याचा स्वभाव अत्यंत आक्रमक होता आणि तो माणसांच्या अंगावर धावून जायचा. संभाव्य धोका ओळखून कुटुंबीयांनी त्याला विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एका व्यक्तीने बैल खरेदीही केला होता.
शनिवारी पहाटे, ठरल्याप्रमाणे खरेदीदार व्यक्ती बैल नेण्यासाठी टेम्पो घेऊन मांजरेकर यांच्या घरी आली. घरापासून सुमारे 100-150 मीटर अंतरावर टेम्पो उभा करण्यात आला होता. पुष्पलता आणि त्यांचे सुपुत्र पंढरी (बंड्या) मांजरेकर यांनी बैलाला गोठ्यातून सोडून टेम्पोकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र, टेम्पोजवळ पोहोचताच क्षणी, क्षणाचाही विलंब न लावता बैलाने अचानक पुष्पलता यांच्यावर भीषण हल्ला चढवला.
बैलाचे तीक्ष्ण शिंग थेट त्यांच्या मांडीत घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अनपेक्षित आणि भीषण घटनेने मांजरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुष्पलता मांजरेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच कुडाळ शहरासह जिल्ह्यातील नातेवाईक आणि नागरिकांनी मांजरेकर यांच्या घरी धाव घेत कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
-बैल खरेदी करणारी व्यक्ती टेम्पो घेऊन दाखल.
-पुष्पलता आणि मुलाने बैलाला गोठ्यातून बाहेर आणले.
-टेम्पोजवळ पोहोचताच बैलाचा अचानक हल्ला.
-पुष्पलता यांचे रुग्णालयात उपचारापूर्वीच निधन.