मुलीचा विनयभंग करुन पळवून नेण्याचा प्रयत्न File Photo
सिंधुदुर्ग

देवगड एसटी स्टॅड परिसरामध्ये मुलीचा विनयभंग करुन पळवून नेण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

देवगड- प्रतिनिधी

देवगड एसटी स्टॅड परिसरामध्ये घरी परचतणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी दि.24 सायंकाळी घडली. यानंतर तिची छेडछाड केल्यानंतर तिला पळवून नेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या प्रकरणी संशयित हरिराम मारुती गिते (वय.३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) याच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये चारजण पोलिस सेवेत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपींच्यावतीने अॅड. श्यामसुंदर जोशी यांनी काम पाहिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड येथे कार घेऊन पर्यटनासाठी आलेले संशयित हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), सटवा केशव केंद्रे (३२, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), श्याम बालाजी गिते (३५, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), शंकर संभाजी गिते (३३, रा. ॐ शिववाटीका, हाऊसिंग सोसायटी, बदलापूर (पू), जि. ठाणे), प्रवीण विलास रानडे (३४, मधुबन सिटी, वसई (पू)) हे मंगळवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास एसटी स्टॅण्डमार्गे देवगड बाजारपेठेच्या दिशेने जात होते. याचमार्गे पीडित युवती ही आपल्या घरी परतत होती. या रस्त्यावरील आनंदवाडी येथे जाणाऱ्या मार्गावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपींनी युवतीला पाहून कार थांबवली.

कारमधील संशयित हरिनाम गिते याने पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून 'माझ्यासोबत येतेस का?' तुला वसई फिरवतो', असे विचारले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून संशयित माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते, प्रवीण रानडे या संशयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाळी केली. 'तिला गाडीत घे, नंतर काय ते बघू' असे बोलून पीडित युवतीला गाडीमधून घेऊन जाण्याच्या इराद्याने व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याची व गंभीर इजा पोहोविण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

याबाबतची फिर्याद पीडित युवतीने देवगड पोलीस स्थानकात दिली असून संशयित हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गिते, शंकर संभाजी गिते, प्रवीण विलास रानडे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना देवगड पोलिसांनी बुधवारी (दि.25) दुपारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT