रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रंग आता भरू लागले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगर परिषद, नगर पंचायतींच्या आरक्षण सोडती जाहीर होऊ लागल्या आहेत. सोमवारी मंत्रालयात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील चार नगर परिषदा व पाच नगर पंचायतींच्या सोडती जाहीर झाल्या असून जिल्ह्यात प्रमुख न.प.वर ‘महिलाराज’ असणार आहे. रत्नागिरी, राजापूर, खेड या नगर परिषद तर देवरुख, लांजा, मंडणगड व गुहागर या नगर पंचायती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या असून चिपळूण व दापोली आरक्षण सर्वसाधारण पडल्याने या ठिकाणी जोरदार लढतीची अपेक्षा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश नगर पालिका व नगर पंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. काही नगर पालिका या ठाकरे गटाकडून शिंदे सेनेकडे आल्या आहेत. शिवसेना फुटीनंतर प्रथमच निवडणुका होत असल्याने प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करणार आहे.
चिपळूणमध्ये सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. माजी आमदार रमेशभाई कदम हे थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असून विरोधात महायुतीकडून उमेश सकपाळ हे तरुण पदाधिकारी रिंगणात असण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या सुरेखा खेराडे या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या जागेवर भाजपही आपला दावा ठोकू शकतो.
रत्नागिरीमध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व आहे. याठिकाणी सर्वसाधरण महिला आरक्षण पडल्यामुळे अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे. परंतु याठिकाणी कोणत्या महिला पदाधिकार्यांना ना. सामंत संधी देतात याकडेही महिला पदाधिकार्यांचे लक्ष राहणार आहे. रत्नागिरी जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, ज्येष्ठ महिला नगरसेविका स्मीतल पावसकर या प्रमुख दावेदार आहेत. मविआकडून कुणाला संधी मिळणार याकडेही लक्ष राहणार आहे.
राजापूर नगर पालिकेतही सर्वसाधारण महिला पडल्याने या ठिकाणी अनेक महिला उमेदवार तयारीत आहेत. आमदार शिवसेनेचे असल्याने शिवसेनेमध्ये अनेक इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये माजी नगराध्यक्षा म्हणून काम केलेल्या महिला पदाधिकारीही उमेदवारीच्या शर्यतीत असू शकतात. उबाठा, भाजपामध्येही अनेकजण तयारी करु लागल्या आहेत.
खेडमध्येही सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने आता शिवसेनेविरोधात याठिकाणी भाजप की वैभव खेडेकर यांचा अपक्ष उमेदवार असणार याकडेही खेडच्या पदाधिकार्यांचे लक्ष लागले आहे. लांजा, देवरुख व मंडणगड, गुहागर या तीनही नगर पंचायतींवर सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने अनेक इच्छूक हिरमुसले आहेत. याठिकाणी कोणत्या महिला पदाधिकार्यांनी महायुती व महाविकास आघाडी संधी देणार हे पहावे लागणार आहे. दापोलीमध्ये सर्वसाधारण आरक्षण पडल्याने या ठिकाणी राज्यमंत्री योगेश कदम यांना उमेदवार ठरवताना कसरत करावी लागणार आहे. नऊपैकी सात नगर परिषद व नगरपंचायतींवर महिलाराज असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिला पदाधिकार्यांचे वर्चस्व दिसून येणार आहे.