रत्नागिरी ः कोकणात महायुती व्हावी, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. युतीबाबत आमदार नितेश राणे यांनी दिलेले उत्तर योग्य आहे. सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले आणि मानसन्मान दिला गेला, तर तसेच मॉडेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवू. रत्नागिरीत काही स्थानिक नेत्यांनी केलेली तोंडबाजी योग्य नाही, असे सांगत, चिपळूणमध्ये कोणाला खुमखुमी असेल, तर धनुष्यबाण आम्ही चालवून दाखवतो, असे नाईलाजाने मला सांगावे लागतेय. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होईल, असे आपल्याला वागायचे नसल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
पोलिस स्मृतिदिनाच्या निमित्ताने बोलताना सामंत यांनी महायुती सरकारने रत्नागिरीतील पोलिस दलासाठी केलेल्या भरीव कामांचा उल्लेख केला. महायुती सरकारने पोलिस दलासाठी एकूण 200 कोटी रुपये खर्च केले असून, यामध्ये अधिकार्यांसह कॉन्स्टेबलच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी निवास संकूल उभारले जात आहे. तसेच, पोलिस दलामध्ये काही व्हॅन आणि मोटरसायकल देखील लवकरच सहभागी होणार असल्याची माहिती ना.सामंत यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या मोर्चावर टीका करताना ना. सामंत यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलाखतीचा आधार घेतला. थोरात यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपला पराभव सामाजिक आणि सार्वजनिक अडचणींमुळे झाला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे व्होटचोरीचा आरोप करत काढलेला मोर्चा ही नवटंकी आहे हे सिद्ध होते, असे सामंत म्हणाले. व्होटचोरीचा प्रश्न विचारल्यास बाळासाहेब थोरात यांची मुलाखत दाखवून उत्तर देऊ शकतो, आम्हाला वेगळे उत्तर देण्याची गरज नाही. निवडणुकीला एक वर्ष झाल्यानंतर त्यांना जाग आली असून, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आणि महायुती जिवंत आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. जर त्यांना स्वाभिमान असेल तर महायुतीचे खासदार आणि आमदारांनी राजीनामा देऊन मग बेलेट पेपरबाबत बोलावे, असे आव्हानही त्यांनी दिले. पुढील पंचवीस वर्ष आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कामातील कथित गैरव्यवहारावर आवाज उठवला. मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कामाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी केली. सन 1992 मध्ये मिठीमध्ये किती गाळ होता, आता किती गाळ आहे, किती बोगस गाड्या लावल्या आणि गाळ कुठे टाकला गेला हे सर्व आपल्याला माहिती असल्याचे ते म्हणाले. मिठी नदीच्या गाळात ज्यांनी पैसे खाल्ले आहेत आणि लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल असं काम केलं आहे, त्याची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी ना. सामंत यांनी केली.
यावेळी त्यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याचा मोठा दावा केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते भाजप प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत काही नेते भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्या पक्षप्रवेशाबद्दलही हे विधान लागू असल्याचे त्यांनी सूचित केले. तसेच, लातूरचा भूकंप आणि 93 च्या बॉम्बस्फोटावेळी शरद पवार यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका महत्त्वाची होती. सध्या आलेल्या संकटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील धावून जात आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला अभिमान वाटतो, असेही ना. सामंत म्हणाले.