आरवली : रेल्वे मंत्रालयाने रेल्वे तिकीट काळाबाजार होण्यावर कितीही आळा घालण्याचा प्रयत्न केला तरी रेल्वे गाडीतच टीटीईकडूनच काळाबाजार होत असल्याचे पुढे येत असल्याने रेल्वे प्रशासनाचा कुंपणच शेत खात असल्याचेच बोलले तर वावगे ठरणार नाही.
रेल्वे मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी वेटिंग तिकीट न मिळता कन्फर्म रिझर्वेशन देण्याचे जाहीर केले खरे पण या घोषनेचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे. या घोषनेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. अजून वेटिंग तिकीट मिळत आहे. तसेच रेल्वे गाडीत जागा शिल्लक असताना वेटिंग तिकिटे कन्फर्म न होता तत्काळ तिकीट देण्यात येत आहेत. ही एकप्रकारे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जाकीर शेकासन यांनी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले आहे.
एखाद्या प्रवाशाचे तिकीट कन्फर्म झाले नाही आणि त्याला तातडीने प्रवास करायचा असेल तर त्याने काय करायचे? असा सवाल विचारला जात आहे. असा प्रवासी जर रेल्वेतुन प्रवास करण्यासाठी गाडीत चढला तर त्याला दुप्पट दंडाची भीती दाखवून त्याचेकडून टीटीई पैसे उकळून बसण्यासाठी आसन देतात. जर तिकीट कन्फर्म होत नसेल तर टीटीईला आसन देण्याचा कोटा आहे का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. एकीकडे रेल्वे प्रशासनाचा तिकीट काळाबाजार थांबवून कारभार पारदर्शी करून प्रवाशांना सुलभ सुविधा देण्याचा प्रयत्न असताना टीटीईकडून रेल्वे प्रवाशांना सहाय्य मिळायच्या ऐवजी प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे. रेल्वे प्रशासनाने यावर आळा घालून प्रवाशांना सुलभ प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.