खेड : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवार दि. 8 ऑक्टोबर रोजी खेड पोलिस ठाण्याला भेट दिली. येत्या 12 ऑक्टोबर रोजी मंडणगड येथे होणार्या न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा करण्यात आला. या भेटीदरम्यान पोलिस अधीक्षक बगाटे यांचे स्वागत पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांनी केले. यावेळी जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांसाठी पोलिस दलामार्फत सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा आढावा घेताना त्यांनी माहिती संकलनात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. पोलिस कर्मचारी तसेच पोलिस पाटील यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शहरात नागरीकांच्या सहभागातून सुरू करण्यात आलेल्या मिशन नेत्रा सध्या बंद आहे. त्या यंत्रणेची बंद सीसीटीव्ही यंत्रणेची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणा तातडीने सुरू करून घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, खेड पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांकडे लक्ष वेधून त्यांनी ही वाहने तातडीने आवाराबाहेर काढावीत, असा आदेश दिला. मात्र अर्धा तास उलटूनही संबंधित कर्मचार्यांनी निर्देशाची अंमलबजावणी न केल्याने अधीक्षक बगाटे यांनी नाराजी व्यक्त केली.
पोलिसांच्या शिस्तीचा अभाव लक्षात घेता, वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांना या दुचाकी वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. या भेटीदरम्यान स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधीक्षक बगाटे यांच्या सूचनांनंतर पोलिस ठाण्यातील कामकाज अधिक काटेकोरपणे पार पाडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.