खेड : तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचा प्रमुख भगवान उर्फ भागोजी कोकरे महाराजाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीने केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच, आता आणखी एका अल्पवयीन मुलीने त्याच्या विरोधात अत्याचाराची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
या तक्रारीच्या आधारे खेड पोलिसांनी भगवान कोकरे महाराज, शिक्षक प्रितेश कदम आणि रोहिणी संतोष वामन या तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 16 ऑक्टोबर 2024 ते 18 जून 2025 या कालावधीत लोटे येथील गुरुकुलामध्ये घडली. पीडितेच्या जबाबानुसार, गुरुकुलात धार्मिक शिक्षण आणि साधनेच्या नावाखाली कोकरे महाराजाकडून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात शिक्षक प्रितेश कदम आणि रोहिणी वामन यांनी देखील सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.