खा. शरद पवार Pudhari File Photo
रत्नागिरी

महाराष्ट्र एक केल्याशिवाय राहणार नाही : खा. पवार

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : सध्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे. जनतेने ते आता ओळखले आहे. त्यामुळे चारसौ पारचा नारा देणारे 240 वर थांबले. आता येथील राज्यकर्ते बदलले पाहिजेत. महाराजांचा पुतळा उभारतानाही पैसे खातात हे न शोभणारे आहे. ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते त्यावेळी जनता त्यांना जागा दाखविते. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आघाडीला साथ द्या. आपण महाराष्ट्र एक केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिपळुणातील सभेत केले. यावेळी आघाडीचा धर्म पाळत चिपळूणच्या उमेदवारीबाबत आघाडीच्या जागा वाटपानंतर निर्णय होईल, असे स्पष्ट केले तर रस्त्याच्या कामात होणार्‍या भ्रष्टाचाराबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधणार, असेही जाहीर भाषणात सांगितले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, चिपळूणचे माजी आ. रमेश कदम, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, पक्ष निरीक्षक बबन कनावजे, पत्रकार मधुकर भावे, चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, कुमार शेटे, नलिनी भुवड, राजाभाऊ लिमये, पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, बाळा कदम, विनोद झगडे, इब्राहिम दलवाई व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भ्रष्टाचारावर सडकून टीका

या सभेत शरद पवार यांनी महाराष्ट्र शासनातील भ्रष्टाचारावर सडकून टीका केली. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो. सरकार म्हणते, हा पुतळा वार्‍याने पडला. मात्र, गेट वे ऑफ इंडिया येथे असलेला 80 वर्षांपूर्वीचा पुतळा आजही तसाच उभा आहे. याचा अर्थ काय? महाराजांच्या पुतळा उभारणीत देखील भ्रष्टाचार... तेथेदेखील पैसे खाता काय हे? असा सवाल त्यांनी या सभेत केला. ते पुढे म्हणाले, आपण शक्यतो गाडीने प्रवास करीत असतो. सातारापर्यंत आपण हेलिकॉप्टरने आलो. पुढेदेखील हेलिकॉप्टरचा प्रवास होणार होता. मात्र, मी गाडीने जायचा निर्णय घेतला. गाडीने गेलो की लोक भेटतात, बोलतात, निवेदने देतात, विकास कसा झाला आहे? रस्ते कसे आहेत हे पाहता येते. त्यामुळे सातार्‍यामध्येच हेलिकॉप्टर सोडले आणि चिपळूणला गाडीनेच आलो. माझ्या आयुष्यात कराड ते चिपळूण इतका खराब रस्ता आजवर पाहिला नाही. याबाबत मी अधिकार्‍यांना विचारले, त्यांनी सांगितले तीनवेळा रस्त्याचे काम केले. याचा अर्थ काय..? सरकारने धोरणे आखली, त्यासाठी पैसे दिले पण त्याचा योग्य उपयोग झाला नाही. पुणे महानगरपालिकेत रस्त्यात खड्डा पडून अख्खा ट्रक जातो. या लोकांना कुठं आणि किती भ्रष्टाचार करावा याचेदेखील भान राहिलेले नाही. मात्र, याची किंमती जनतेला मोजावी लागते. त्यामुळे आता ही गोष्ट आणि हा भ्रष्टाचार राज्याच्या नजरेसमोर आणणार. मुख्यमंत्र्यांची याबाबत भेट घेणार असे सांगितले.

आ. नितेश राणेंच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी

पुढे ते म्हणाले, आज राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. सत्ता येतेही आणि जातेही. मात्र, सत्तेत असतो तेव्हा संयम ठेवायला हवा व सत्ता नसते तेव्हा काम करीत राहायचे असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मुख्यमंत्री होते. त्यांचे चिरंजीव आज ज्याप्रकारे टीका करतात, बोलतात महाराष्ट्राच्या इतिहासात असे कोणी बोलल्याचे आपल्याला आठवत नाही. आज या लोकांची भाषा भडकविणारी आहे. या देशात हिंदू, मुस्लीम, शिख एकत्रित राहतात. मात्र, त्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा मुस्लीम समाजाविषयी वारंवार टोकाचे भाष्य करतो. याची दखल मात्र त्या पक्षाचे वरिष्ठ घेत नाहीत. याचा अर्थ काय? त्यामुळे सत्ता यांच्या डोक्यात गेलेली आहे. त्यांची जागा आता जनता दाखवेल, असेही खा. पवार म्हणाले.

प्रधानमंत्री ज्यावेळी काश्मिरात गेले त्यावेळी त्यांनी काँग्रेसला नक्षलवाद्यांचा पक्ष म्हटले, भ्रष्टाचारी पक्ष म्हटले. मात्र, काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला आहे. नेहरूंनी हा देश पुढे नेला हा इतिहास आहे. इंदिरा गांधींनीदेखील जगभरात भारताची इज्जत राखली आणि वाढवली. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. तरीही त्यांची पुढची पिढी आज देशाचा विचार करीत आहे. सोनिया गांधी हा देश सोडून परदेशात गेल्या नाहीत. त्यांची पुढची पिढीदेखील देशाचा विचार करीत आहे. तरी तुम्ही त्यांना भ्रष्टाचाराच्या तीन पिढ्या म्हणता याचे आश्चर्य वाटते. यांच्या हातात सत्ता आहे. सत्तेचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे आज परिवर्तनाची गरज आहे. प्रधानमंत्री चारसौ पार म्हणत होते. त्यांना जनतेने 240 वर ठेवले. चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार तुमच्याबरोबर नसते तर हे सरकार सत्तेत आले नसते, असा टोलादेखील खा. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.

आघाडीच्यावतीने एकत्र लढूया

आता राज्याची निवडणूक आहे. लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे दहापैकी आठ खासदार निवडून आले. महाविकास आघाडीचे 31 खासदार विजयी झाले. याचा अर्थ आमची भूमिका जनतेला पटली आहे. महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर महाविकास आघाडीला साथ द्या. येथील रस्ते सुधारायला हवेत, भ्रष्टाचार रोखायला हवा. त्यामुळे आघाडीच्यावतीने एकत्र लढूया. महाराष्ट्राला चेहरा दिल्याशिवाय आपण राहणार नाही.

कोकणचा चेहरा बदलणार

ज्या-ज्या वेळी आपण हेलिकॉप्टरने कोकण व गोव्याला जातो त्या-त्या वेळी हिरवागार कोकण पाहतो. फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा निर्माण झाल्या आहेत. कोकणचा चेहरा बदलायचा असेल तर चांगले रस्ते, उद्योग, बाजारपेठा, दळणवळण यंत्रणा, शेती, नवे प्रकल्प इथे यायला हवेत. त्यामुळे आपण कोकणचा चेहरा बदलल्याशिवाय राहाणार नाही. प्रशांत यादव हे वाशिष्ठी मिल्कच्या माध्यमातून चांगले काम करीत आहेत. 50 हजार लीटर दूध गोळा करून त्यावर प्रक्रिया करीत आहेत. गोकूळ, वारणासारख्या प्रकल्पांनी त्या-त्या जिल्ह्याचे अर्थकारण बदलले आहे. अशाचप्रकारे रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण बदललण्यासाठी प्रशांत यादव यांना साथ द्या, त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करा. आपण त्यांच्या ताकदीनिशी पाठीशी राहू असेही खा. शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

याआधी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी आपल्या भाषणात वाशिष्ठी मिल्क आणि परिसरात सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला व आपल्याला साथ देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मधुकर भावे यांनी महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केली. कराडचे माजी सहकारमंत्री व आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. रमेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कदम यांनी आ. शेखर निकम यांच्यावर टीकेची झोड उठवली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT