साखरपा : लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील साखरपा आणि लांजा तालुक्यातील पन्हळे धरणांच्या गळती दुरुस्तीची रखडलेली कामे लवकरच मार्गी लागणार आहेत.
2001 मध्ये बांधलेली ही धरणे कालांतराने गळतीमुळे अकार्यक्षम झाली होती. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. आमदार किरण सामंत यांनी स्थानिक जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांचा अहवाल प्राप्त झाला असून पुणे यांचा अंतिम अहवाल लवकरच अपेक्षित आहे. त्यानंतर अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर करण्यात येणार आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर साखरपा धरणामुळे 260 हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. उन्हळे धरणामुळे 330 हेक्टर शेतीला फायदा होणार असून पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.