रत्नागिरी : दीपक कुवळेकर
रत्नागिरी व्हाया कोल्हापूर ते सोलापूर फक्त वाद आणि वादच ओढवून घेतलेल्या त्या जि.प. मधील अधिकाऱ्याचे अनेक कारनामे हळूहळू पुढे येत आहेत. सहा वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हा अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप करून तो पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आले होते. यावेळी या अधिकाऱ्याची चांगलीच लक्तरे काढण्यात आली होती. या अधिकाऱ्याला सभागृहातून अक्षरश: हाकलून देवून तंबी देण्यात आली होती. यामुळे या अधिकाऱ्याची वादग्रस्त कारकिर्दीमुळे हा अधिकारी नेहमीच फक्त वादाचाच ‘किरण’ राहिला आहे.
लाचखोर व वादग्रस्त ठरलेल्या अधिकाऱ्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेने तब्बल तीन विभागाचा प्रमुख केल्याने सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ‘लाच घ्या आणि प्रमोशन मिळवा’ असा फंडा जि.प.ने राबवल्याचा आरोपही होत आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याची कारकिर्द ही नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. हा अधिकारी सहा वर्षांपूर्वी रत्नागिरीत होता. यावेळी तो वादग्रस्तच ठरला होता. तो प्रत्येक कामासाठी पैसे घेतो असा आरोप त्यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. तसेच पुराव्यानिशी ते सिद्ध सुद्धा करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन जि.प. सदस्य उदय बने यांनी हा विषय उचलून धरला होता. सर्व सभागृह आक्रमक बनले होते. शेवटी या अधिकाऱ्याला सभागृहाच्या बाहेर जावे लागले होते. यानंतर त्याची महिनाभरातच बदली झाली होती.
कोल्हापूरातही त्याची कारकिर्द धड गेली नाही. तो पैसे घेतो असा आरोप सभागृहात झाला होता. त्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जि. प. ने केला होता. यानंतर त्याची बदली सोलापूर येथे करण्यात आली. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याला कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली होती. पीएच.डी. देणारी ही संस्थाच बोगस असल्याचे शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झाल्याने त्यांच्या तक्रारीवरून पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात या अधिकाऱ्यावर 2019 मध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. सोलापुरात 2022 मध्ये लाच घेतल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस चौकशीत तर त्यांच्याकडे 5 कोटी 85 लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती.
सध्या या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच पोलिसही लाच तसेच बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी तपास सुरू आहे. असे असताना जिल्हा परिषदेने तीन खात्याचा पदभार त्यांच्याकडे दिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी म्हणजे सहा वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात असतानासुद्धा ते वादातच होते. त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर शिक्षा म्हणून रत्नागिरीत त्यांना पाठवण्यात आले आहे. ही सर्व पार्श्वभूमी जिल्हा प्रशासनाला माहिती असूनही त्याला तीन खात्याचा प्रमुख केल्याने सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
सहा वर्षांपूर्वी रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर तसेच सोलापूर व कोल्हापूर येथे असताना त्यानंतर पुन्हा रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर हा अधिकारी प्रामाणिकपणाचा तोरा दाखवित होता. पण लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचा तोरा गळून पडला असून भ्रष्ट चेहरा समोर आला आहे.