चिपळूण : गाणे-खडपोली एमआयडीसीतील साफ यिस्ट कंपनीमधील 240 कामगारांपैकी 130 कंत्राटी कामगारांना रुजू करून घेण्यात आले आहे. अजूनही 110 कामगारांना अद्याप कामावर हजर करून घेण्यात आलेले नाही. या बाबत कंपनी व्यवस्थापनाला पाच दिवसांची मुदत देण्यात आली होती; मात्र ती अद्याप न पाळली गेल्याने या कामगारांना कामावर हजर करून न घेतल्यास दि. 14 ऑक्टोबरपासून साफ यिस्ट कंपनीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत याबाबत त्यांनी माहिती दिली.
साफ यिस्ट कंपनीमध्ये चिपळूण तालुक्यातील दसपटी भागातील खडपोली, गाणे, वालोटी, कळकवणे व अन्य लगतच्या गावातील अनेक स्थानिक कामगार गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ काम करीत आहेत; मात्र दि. 26 सप्टेंबर रोजी कंपनी व्यवस्थापनाने अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता कामगारांना रूजू करून घेतले नाही. त्यामुळे कामगारांनी साफ यिस्ट गेटसमोर रात्रभर थांबून आंदोलन केले. अखेर आ. शेखर निकम, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये बैठक झाली व या कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने कामावर हजर करून घेतले जाईल, असे आश्वासन कंपनी व्यवस्थापक श्री. आंबेकर यांनी बैठकीमध्ये दिले. तसेच व्यवस्थापनाने या कामगारांच्या स्वाक्षरीदेखील घेतल्या; मात्र 240 कामगारांपैकी 130 कामगारांन पहिल्या टप्प्यामध्ये कामावर हजर करून घेतले आहे. त्यानंतर कुणालाही कामावर रूजू करण्यात आलेले नाही. ज्या लोकांना कामावर घेतले आहे त्यांना हिनकारक वागणूक दिली जात आहे. कामगारांकडून अतिरिक्त काम करवून घेतले जात आहे.
कंपनीने कच्च्या मालाची कमतरता असल्याने उत्पादन कमी होत आहे, असे खोटे कारण प्रशासनाला सांगून आम्हाला कामावरून कमी केले आहे तर नव्या महिला कामगारांची भरती एका ठेकेदारामार्फत सुरू असल्याचे यावेळी कामगारांनी सांगितले. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्यावर आमचे कुटुंब अवलंबून आहे. व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत कामावर हजर करून न घेतल्यास आम्ही 240 कामगार व कुटुंबासह आमरण उपोषण करणार आहेत, असा इशारा अमित गजमल, संतोष जाधव, शेखर सकपाळ, महेश मिरगल आदी कामगारांनी दिला आहे. या बाबत संबंधितांना निवेदन देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, दादा साळवी, ॲड. अमित कदम, प्रकाश पवार, स्वप्नील शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.