रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी आगारात गणेशोत्सवात ई-बसेस येणार असे सांगितले होते. मागील वर्षी ही ई-बसेस रस्त्यावर धावतील असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप चारही चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. दापोली, रत्नागिरीचे काम काही प्रमाणात झाले आहे, तर खेड, चिपळूणमध्येे कामाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात ई-बसेस कोकणाच्या रस्त्यावर धावण्याचे शक्यता अद्याप तरी धुसरच दिसत आहे.
कोकणातील रत्नागिरी विभागात येत्या गणेशोत्सवात तब्बल 152 नवीन ई-बसेस येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 30 ई बसेस गणेशोत्सवात धावतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे रत्नागिरीतील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तसेच काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात स्मार्ट नवीन बसेस आल्या होत्या. याला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळत आहे. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात रत्नागिरी तब्बल 152 ई-बसेस येतील, पहिल्या टप्प्यात 30 ई-बसेस रत्नागिरीच्या रस्त्यावर धावतील, असे सांगण्यात आले. मात्र अद्याप ई-बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशनचे काम अद्याप संथगतीनेच सुरू असल्यचे चित्र आहे.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावात येतात. त्यामुळे लालपरीला मोठी गर्दी होत असते. मात्र जोपर्यंत चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ई-बसेस येणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर चार्जिंग स्टेशनचे काम झाल्यास ते शक्य होईल, अन्यथा गणेशोत्सवात तरी ई-बसेस येण्याची शक्यता धुसरच दिसत आहे. कामे वेगाने सुरू झाल्यास दिवाळीत कोकणकरांना ई-बसेसमधून प्रवास करण्यास मिळणार एवढं मात्र निश्चित आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ई-बसेस येणार असे मागील वर्षी ही सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात ई-बसेस धावतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप चारही ठिकाणचे चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच जिल्ह्यातील इतर आमदारांनी याकडे लक्ष देवून पाठपुरावा करणे गरजेचे आहे, अशीच मागणी नागरिक करीत आहेत.
दापोली, रत्नागिरी येथील चार्जिंग स्टेशनचे काम सुरू आहे. चार्जिंग कनेक्शन मिळाले आहे. वीज कनेक्शनसाठी लागणारे विविध साहित्य आले आहे. विविध मशिनरी ही आल्या आहेत. लवकरच काम पूर्ण होईल.प्रज्ञेश बोरसे, विभागीय नियंत्रक, रत्नागिरी