अनुज जोशी
खेड ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका उड्डाणपुलावरून पुढे जाताच भरणे-आंबवली मार्गाला जोडणार्या ठिकाणी रस्त्याची अत्यंत धोकादायक अवस्था झाली आहे. या ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, लहानमोठ्या अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने एकीकडे सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी भूसंपादनाचे काम केले असले, तरी त्या सर्व्हिस रोडची नेमकी हद्द कुठपर्यंत आहे हे स्पष्ट न झाल्याने संबंधित विभागांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागांमध्ये या भागाची जबाबदारी कोणाची, याबाबत स्पष्टता नसल्याने रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
दररोज या मार्गावरून शाळकरी मुले, दुचाकीस्वार, तसेच लहान वाहने यांचा मोठ्या प्रमाणावर प्रवास सुरू असतो. रस्त्याच्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होणे, अपघातांची शक्यता वाढणे, तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांनी संबंधित विभागांनी तातडीने या ठिकाणी दुरुस्तीची कामे करून रस्ता सुस्थितीत ठेवावा, अशी मागणी केली आहे. रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.