रत्नागिरी : भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना गुरुवारी (23 ऑक्टोबर) रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे घडली. मौजे मजगाव येथील अबीद अली अब्दुल हमीद काझी यांच्या मालकीच्या आंबा कलम बागेतील विहिरीमध्ये एक बिबट्या पडला होता. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन केवळ 15 मिनिटांत बिबट्याची यशस्वीरीत्या सुटका केली आणि त्याला सुरक्षित जीवदान दिले.
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलिस पाटील अशोक केळकर यांनी वनपाल पाली यांना फोनवरून बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांना या माहिती देण्यात आल्यावर रेस्क्यू टीम, पिंजरा आणि आवश्यक साहित्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन कर्मचार्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, आंबा कलम बागेतील बिबट्या पडल्याचे आढळले. वन विभागाच्या प्रशिक्षित पथकाच्या प्रयत्नांमुळे अवघ्या पंधरा मिनिटांतच बिबट्या पिंजर्यामध्ये सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी-चिपळूण, गिरिजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव मोहीम राबवण्यात आली.