रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकर्यांकडून भात लागवणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यात 90 टक्क्यांपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात युरियाचा साठा खुला करण्यात आला आहे. 2025-26 खरीप हंगामासाठी एप्रील ते सप्टेंबर खतांचे (युरिया, डीएपी, संयुक्त खते, एसएसपी) 12908 मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी युरियाचे 6984 मे.टन. आवंटन मंजूर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 7600.59 मे.ट. खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.
मागील तीन महिन्यांचा एप्रील ते जून विचार करता जिल्ह्यामध्ये युरिया, मिश्र खते, संयुक्त खते, एसएसपीचे 5524 मे.ट. आवंटनाच्या तुलनेत 11741 मे.टन एवढी खते उपलब्ध झाली आहेत. तसेच युरियाच्या 3073 मे. टन आवंटनाच्या तुलनेत 7237 मे. टन युरियाची उपलब्धता झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मागील तीन वर्षांमध्ये खतांचा सरासरी वापर 12297 मे. टन एवढा आहे. सध्याच्या स्थितीत मंजूर आवंटन आणि उपलब्ध खते यांची तुलना केली असता जिल्ह्यामध्ये 90 टक्के खते उपलब्ध झाली आहे. वेळोवेळी शेतकर्यांच्या मागणीचा विचार करता भात पिकासाठी युरिया खताची उपलब्धता व्हावी यासाठी जिल्ह्यातील 500 मे. टन बफर स्टॉकमधील 416 मे. टन युरियाचा 83 टक्के साठा खुला करून देण्यात आला आहे. याचा फायदा दुर्गम भागात राहणार्या शेतकर्यांबरोबरच इतर शेतकर्यांना ही झाला आहे.
जिल्ह्यात भात पीक व फळझाडांच्या खते भरणी करता आवश्यक असलेली आणखी खते उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हास्तरावरून कृषी विभाग प्रयत्न करत आहे. काहीच दिवसापूर्वी पालकमंत्री सामंत यांच्याहस्ते बियाणे वाटप करण्यात आली. जिल्ह्यातील 1537 गावांपैकी 814 गावात 449 गटांमार्फत बांधावर खते, निविष्ठा वितरण करण्यात आल्या. सामूहिक खरेदीमुळे आर्थिक बचतीसह वेळेची देखीत बचत झाली आहे.शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी