दापोली : दापोली तालुक्यात परतीच्या पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून गुरुवारी (दि. 23) संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास साखळोली येथे दोन घरांवर वीज कोसळल्याने आग लागली. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
साखळोली येथील रामकृष्ण बर्वे व डॉ. राजकुमार बर्वे यांच्या घरावर तसेच शेजारील चंद्रशेखर करमरकर यांच्या घरावर वीज कोसळल्याने मोठे नुकसान झाले. अचानक वीज मीटरजवळ पडल्याने मीटर, वायरिंग तसेच घरातील खुर्च्या, बेड पेटले. तसेच शेजारील करमरकर यांचे बंद घरावर वीज कोसळली यावेळी ग्रामस्थांनी जळीतग्रस्त घरांचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून आग नियंत्रणात आणली. या घटनेत करमरकर यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलिस पाटील सुनील सोनू गौरत, उपसरपंच दिनेश जाधव, माजी उपसरपंच अनिल शिंदे, मंगेश गोरीवले, प्रमोद बुरटे आदी ग्रामस्थांनी तत्परतेने मदत केली. त्यांच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला.
या आगीत रामकृष्ण व कुमार बर्वे यांच्या घरातील विद्युत उपकरणे, इन्व्हर्टर, टीव्ही, फर्निचर यांचे मोठे नुकसान झाले असून, विशाल बर्वे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच विनोद गोंधळेकर, विशाल गोंधळेकर, सागर बर्वे यांच्यासह समाजबांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील जालगाव येथेही वीज पडून नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले होते. आता साखळोलीतील या घटनेमुळे परतीच्या पावसाचा फटका दापोली तालुक्याला बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.