रत्नागिरीत रंगला सायकल स्पर्धेचा थरार 
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरीत रंगला सायकल स्पर्धेचा थरार

साईराज, शमिका अव्वल, पुरुष गटात हर्षल, डर्विन, आस्ताद, प्रीती, योगेश्वरी आणि किरण प्रथम

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : चढ-उतारांचे घाट व सपाट रस्त्यांवर जवळपास 50 कि.मी.च्या मार्गावर सायकलवरचा थरार रविवारी रत्नागिरीकरांनी अनुभवला. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन भाट्ये-गावखडी व परत भाट्ये या मार्गावर ही देशपातळीवरील सायकल स्पर्धा झाली. स्पर्धेत मुलांच्या गटात साईराज भोईटे, मुलींच्या गटात शमिका खानविलकर यांनी अव्वल स्थान पटकावले. पुरुषांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये हर्षल खांडवे, डर्विन व्हिएगास, आस्ताद पालखीवाला यांनी आणि महिलांच्या विविध गटात प्रीती गुप्ता, योगेश्वरी कदम, किरण जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

‘दिमाग से खेलेगा वही जितेगा’ अशी या स्पर्धेची टॅगलाईन होती. भाट्याचा पहिला चढाव पार करून पुढे सपाट रस्ता, गोळपला उतार, पावस बायपास रोडची वळणे, चढ, नंतर तीव्र उतार, पुन्हा वळणावळणांचा चढणीचा रस्ता, गावखडीचा तीव्र उतार अशा रस्त्यावरून स्पर्धक सुस्साट वेगाने जाताना पाहायला मिळाले. मार्गावर नवलाई नादब्रह्म ढोल पथकाने ढोल-ताशे वाजवून व रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्थानिक ग्रामस्थांनी सहभागी झालेल्या स्पर्धकांचा जोश वाढवला. बक्षीस वितरण कार्यक्रम हॉटेल विवेक येथे झाला. या वेळी प्रमुख पाहुणे टिलेज अ‍ॅग्रोचे मालक धनंजय डबले, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, हॉटेल विवेकचे सार्थक देसाई, अ‍ॅड प्लसचे मंगेश सोनार, प्रवीण पाटील, सुवर्णसूर्य फाऊंडेशनच्या संचालिका . तेजा देवस्थळी आदी उपस्थित होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब चे महेश सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले .

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सौरभ रावणांग याने पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या विशेष प्रयत्नाने मिळालेली नवी सायकल वापरून हे अंतर 1 तास 32 मिनिटांत पार केले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे डॉक्टर नितीन सनगर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली त्याने यासाठी मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वीपणे पार केली. हीच सायकल वापरून रुद्र दर्शन जाधव याने देखील विभाग स्तरावर धडक मारली आणि पालक मंत्री उदय सामंत यांचा विश्वास सार्थ ठरवला. रुद्रच्या यशामागे देखील रत्नागिरी सायकलिस्ट क्लब चा मोलाचा वाटा आहे.

गटनिहाय विजेत्यांची नावे

11 ते 17 वर्षे मुलांचा गट (25 किमी)- साईराज भोईटे (सातारा, वेळ 35 मिनिटे), रुद्र चव्हाण (मुंबई), परिक्षित परब (मुंबई), रुद्र जाधव (रत्नागिरी), आयुष चव्हाण (मुंबई). मुलींचा गट- शमिका खानविलकर (रत्नागिरी, वेळ 49:14), आराध्या चाळके (रत्नागिरी), धनश्री कुडकेकर (रत्नागिरी).

मास्टर्स (50 किमी, पुरुष गट)- हर्षल खांडवे (नाशिक, वेळ 1:32:49), प्रसाद आलेकर (चिपळूण), किरण पवार (मुंबई), संतोष बाबर (उंब्रज), रोहन कोळी (मुंबई), अभिजित पड्याळ (रत्नागिरी), चंद्रकांत मोरे (सातारा), समीर नाडकर्णी आणि फ्रान्सिस रॉड्रिग्ज (दोघेही गोवा).

एलाईट पुरुष गट- डर्विन व्हिएगास (गोवा, 1:23:28), यश थोरात (ठाणे), हनुमंत चोपडे (सांगली), तेजस धांडे (नागपूर), आयुष (दिल्ली).

मास्टर्स महिला गट- प्रीती गुप्ता (पुणे, वेळ 1:55:47), कल्याणी तुळपुळे (दापोली), आदिती डम (नवी मुंबई).

एलाईट महिला गट- योगेश्वरी कदम (सांगली, वेळ 1:40:31), सिद्धी दळवी (ठाणे).

ज्येष्ठ पुरुष गट- आस्ताद पालखीवाला (लोणावळा, वेळ 1:38:26), प्रशांत तिडके आणि आदित्य पोंक्षे (दोघेही पुणे) ज्येष्ठ महिला- किरण जाधव (मिरारोड, वेळ 2:25:39), वर्षा येवले (कल्याण), सुजाता रंगराज (मुंबई) यांनी यश मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT