चिपळूण शहर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निवडणूक नियोजन संदर्भातील कार्यक्रमांमध्ये चिपळूण न.प.तील प्रभाग रचनेत काहीअंशी फेरबदल झाले असल्याची माहिती मिळत असून, प्रगणक गट न फोडता काही किरकोळ बदलांतर्गत प्रभाग रचनेत अंशतः बदल करण्यात आले आहेत. प्रामुख्याने शहरातील उपनगर प्रभाग रचनेत बदल झाल्याची सांगितले जाते, तर शहरातील मध्यवर्ती भागातील प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. परिणामी, अंशतः बदल झालेल्या प्रभागात इच्छुकांमध्ये मतांच्या गणिताची बेरीज-वजाबाकी आणि जुळवाजुळव सुरू झाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निवडणूक नियोजन कार्यक्रम अंतर्गत सुरू झालेल्या विविध नियोजनात चिपळुणातील नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापूर्वी 13 प्रभागांमधून 26 नगरसेवकांची जनतेतून निवड करण्यात येत होती. आता 14 प्रभागांतून 28 नगरसेवकांची निवड होणार आहे. म्हणजेच एका प्रभागाची वाढ झाली आहे. साधारणतः दोन वर्षांपूर्वी निवडणुका होणार या अपेक्षेने त्यावेळी निवडणूक आयोगाकडून निवडणूक नियोजन कार्यक्रम अंतर्गत आरक्षण, प्रभाग रचना व नगरसेवक आरक्षण हा कार्यक्रम राबविला होता. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली होती. तसेच प्रभागातील नगरसेवक आरक्षणेदेखील जाहीर झाली होती. मात्र, सुमारे दोन वर्षांच्या कालावधीत निवडणुका न झाल्याने आता वर्षाअखेर निवडणुका होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून तयारी हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत सप्टेंबरअखेर दिलेल्या कार्यक्रमातील नियोजन पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार चिपळूण नगर परिषदेतील प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी विशाल भोसले व मालमत्ता विभागप्रमुख शेडगे यांच्या समितीने संबंधित कार्यक्रमातील नियोजन सुरू केले आहे. या नियोजन अंतर्गत शहरातील काही प्रभागरचनेत अंशतः बदल केल्याचे सांगितले जाते. प्रामुख्याने हे बदल उपनगर प्रभागात करण्यात आल्याचे समजते. झालेल्या अंशतः बदलांमुळे इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काही इच्छुकांनी मतांच्या बेरजेची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. अंशतः बदलात अशी एकगठ्ठा मते आपल्या वाट्याला येणार की नाहीत याची चिंता इच्छुकांना लागली आहे.