जाकिरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत नियमितपणे वाहनांची तपासणी केली जाते. दरम्यान, एप्रिल 2025 ते सप्टेंबर या कालावधीत वाहतून नियमांचे उल्लंघन करणार्या 3 हजार 452 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 1 कोटी 63 लाख 10 हजार रुपयांचा दंड व 7.25 लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे; अन्यथा यापुढेही दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात अपघातांना आळा बसावा आणि वाहतुकीला शिस्त लागावी, या द़ृष्टिकोनातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वायुवेग पथकामार्फत नियमितपणे तपासणी केली जाते. विभागाने घालून दिलेल्या मर्यादेतच वाहन चालवणे, विविध नियम पाळणे अपेक्षित आहे. मात्र, काही वाहनधारक नियम तोडून सुसाट वाहने चालवत आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असते. काही किरकोळ तर काही गंभीर अपघात काही वेळा शहरातील रस्त्यावर, महामार्गावर घडले आहेत. आतापर्यंत वायुवेग पथकामार्फत 3 हजार 452 दोषी वाहनांवर कारवाई करीत दीड कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणार्या, तसेच वाहतुकीचे नियमभंग करणार्या 121 प्रवासी बसेस, रिक्षा यांच्याकडून 15.80 लाख इतकी दंडवसुली करण्यात आली आहे. 31 दोषी स्कूलबसेसवर दंडात्मक कारवाई झाली आहे.