रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या मुसळधार, अवकाळी पावसामुळे कोकणातील पिकांना मोठा फटका बसला आहे. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरदरम्यान 10 हजार 82 शेतकर्यांचे 2 हजार 213.07 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी सर्वाधिक भात पीक 2102 हेक्टर, नाचणी 104.26 हेक्टर, फळ पिके 1.09, भाजीपाला 4.91 हेक्टर क्षेत्रावर फटका बसला आहे. एकंदरीत 187.92 लाखांचे भात, नाचणीसह इतर फळ पिकांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चार महिने पावसाने दमदार हजेरी लावली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धो धो पाऊस झाल्याने खरीप पेरण्याला विलंब झाला. त्यानंतर जून, जुलैमध्ये पावसाने तुफान बटिंग केली. त्यामुळे जिल्ह्यात 55 हजार 551 हेक्टर क्षेत्रावर भात, नाचणी पिकांची पेरणी करण्यात आली होती. त्यापैकी सर्वाधिक पिकांची पेरणी, लागवड भात पिकांची करण्यात आली होती. सप्टेंबर महिना संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात वादळी वार्यासह परतीच्या पावसाने, अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील भात पिकांना मोठा फटका बसला. भात कापणी करून ठेवले भात पिकात पाणीच पाणी गेले. कित्येक जणांचे पिके आडवी झाली.1 ते 31 ऑक्टोबर या एका महिन्यात 2 हजार 213 हेक्टरवर भात पिकांचे नुकसान झाले. तर चार महिन्यात तब्बल 267 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती.
एकंदरीत, यंदा भात पिके मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे आली होती. उत्पादनही वाढेल असा अंदाज होता मात्र ऑक्टोबर या एका महिन्यात व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकर्यांचा तोंडसा घास गेला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या डोळ्यामधून अक्षरक्षा आश्रू येत आहेत. वरुणराजा बास आता, नको पाऊस पाडू, अशीच आर्त हाक कोकणातील बळीराजा मारत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले. पाच महिन्यात तब्बल 2213 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून 10 हजार 82 शेतकर्यांचे 187 लाखांचे पीक मातीमोल झाले आहे. आतापर्यंत 965.1 क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे झाली आहेत.उर्वरित 4 हजार 869 शेतकर्यांचे 1248.6 हेक्टरक्षेत्रावरील पंचनामे शिल्लक आहेत.अद्याप काम सुरूच आहे. नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहे.शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नगिरी